

सावंतवाडी : तालुक्यात एका गावात झालेल्या परप्रांतीय तरुणीवरील अत्याचार प्रकरणात फरार मुख्य संशयित थॉमस बा (वय 22, रा. लसिया, झारखंड) याला सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने गोव्यातून ताब्यात घेतले. त्याला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.
यातील दुसरा संशयित अद्यापही फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील एका गावात खाणीवर काम करण्यासाठी परप्रांतीय जोडपे आले होते. त्या जोडप्याच्या एका मुलीवर दोन परप्रांतीय मजुरांनी अत्याचार केला होता. या घटनेनंतर दोन्ही संशयितांनी पलायन केले. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकानी दिलेल्या तक्रारीवरून थॉमस बा व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा काही तासातच पोलिसांनी मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
दोन्ही संशयितांचा शोध घेण्यासाठी सावंतवाडी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली होती. यात एका पथकाने शनिवारी रात्री उशिरा संशयित थॉमस बा या परप्रांतीय मजूराला गोवा येथून ताब्यात घेतले. तर दुसरा संशयित अद्यापही फरार असून त्याच्या मागावर पोलीस पथक आहेत.
अटक केलेल्या प्रमुख संशयिताला रविवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता बुधवार,8 ऑक्टोबर पर्यंत चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपीला सहकार्य करणारा अन्य एक संशयित मजूर फरार असून त्यालाही लवकरच ताब्यात घेणार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.