सावंतवाडी ः महाविकास आघाडीतून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण विभागीय समन्वयक अर्चना घारे- परब यांना पक्षाने निलंबित केले आहे. तसे पत्र पक्षाचे राज्य सरचिटणीस रवींद्र पवार यांनी त्यांना दिले आहे.
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सुटला आहे. त्या पक्षाचे उमेदवार राजन तेली हे येथे निवडणूक लढवत आहेत. असे असताना अर्चना घारे- परब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. हे पक्ष शिस्तीस धरुन नसल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.(Maharashtra assembly poll)
अर्चना घारे -परब यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता बुधवारच्या जाहीर प्रचारसभेत टीका केली होती. महायुतीला मदत म्हणजे महाराष्ट्रद्रोहींना मदत करण्यासारखे आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रप्रेमी आहे. त्यामुळे आघाडीत बंडखोरी केलेले महाराष्ट्रद्रोही आहेत असे ठाकरे म्हणाले होते तर घारे -परब यांना मत म्हणजे दीपक केसरकर यांना मत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रवीण भोसले यांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर घारे -परब यांचे झालेले निलंबन आघाडीला दिलासा देणारे आहे. जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भास्कर परब यांना हे पत्र आले आहे. त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात घारे- परब यांच्याबरोबर काम करणार्या पक्षाच्या सर्व पदाधिकार्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचे काम करावे, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.(Maharashtra assembly poll)
दरम्यान याबाबत अधिकची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सचिव तथा राज्य निरीक्षक समन्वयक शेखर माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणताही अधिकृत आदेश सचिव तथा राज्य निरीक्षक म्हणून आपणापर्यंत आलेला नाही, त्यामुळे याबाबतची पुष्टी उद्या होऊ शकेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. पाठवलेले पत्र हे अधिकृत की अनधिकृत याबाबत तूर्तास कळलेले नाही याची माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी भ्रमणध्वनीवरून बोलताना सांगितले.