

वेंगुर्ला: अजय गडेकर
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. आडेली गावातील वेंगुर्ला-सावंतवाडी मुख्य रस्त्यावर असलेल्या स्ट्रीट लाईट्स बंद असल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सध्या परतीचा पाऊस सुरू असल्याने रात्री अंधारात चाचपडत जावे लागते आहे.
स्ट्रीट लाईटचे पोल तिरके असून, काही ठिकाणी कमी पॉवरचे बल्ब वापरले गेले आहेत, ज्यामुळे वीज बिल नियमित भरणार्या नागरिकांमध्ये दुजाभाव होत असल्याची भावना आहे. ठेकेदारी पद्धतीमुळे हा 'सावळागोंधळ' वाढल्याचे दिसते.
मुख्य रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी आणि न उचललेली झाडे अपघातांना आमंत्रण देत आहेत. मागील काळात पोस्ट स्टॉपजवळ झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला, तर मठ येथील अपघातातही आडेलीतील एका युवकाचा मृत्यू झाला. मठ कुडाळतीठा येथे डिव्हायडर नसल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे.
आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे 'आयुष्मान आरोग्यवर्धिनी' असे नामकरण झाले असले तरी, येथील मूलभूत सुविधांची वानवा कायम आहे. डॉ. अश्विनी माईणकर -सामंत, डॉ. संजीवनी पाटील, शेखर कांबळी हे कोरोना कालावधीपासून चांगली सेवा देत आहेत. परंतु, या हॉस्पिटलमध्ये एक्स रे मशीन, सोनोग्राफी मशीन, डिलिव्हरीसाठी योग्य सुविधा, कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञ निवासी स्वरूपात उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. भाजप-शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे ॲम्ब्युलन्स सेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
आडेली ग्रामपंचायतीची चांगली इमारत असूनही रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत गावाचे सौंदर्य बिघडवत आहे. गावात स्थानिक व अनुभवी कंत्राटदार असताना, 'बोगस' पोटठेकेदार नेमल्याने अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मशीनचा वापर करून कामे केल्याने गवताचे लोबे रस्त्यांवर लोळत आहेत, ज्यामुळे पोटतिडकीने काम करणारे स्थानिक घमेले कामगार बेरोजगार झाले आहेत.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची अपेक्षा
आ. दिपक केसरकर यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना, ग्रामसचिवालय आणि अन्य विकासकामांसाठी भरघोस निधी दिला आहे. सरपंच यशस्वी कोंडसकर आणि मतदारसंघातील अन्य सरपंचांनी या निधीचा योग्य वापर करून आडेलीच्या विकासात लक्ष घालावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. बचत गटाच्या महिला चांगल्या पद्धतीने काम करत असून, स्थानिक ग्रामस्थांनी शाळा नं. १ च्या संरक्षक भिंतीचे काम अंगमेहनतीने व मोफत पूर्ण करून एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या समस्यांवर तातडीने लक्ष देऊन आडेलीला समस्यामुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.