नांदगाव : देवगड-निपाणी राज्य मार्गावर वाशिनवाडी येथील धोकादायक वळणावर दोन मोटारसायकलांचा शुक्रवारी (दि.4) अपघात झाला. या अपघातात एक दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध पडला. यावेळी त्याच्या डोक्यावरुन जाणाऱ्या ट्रकचे चाक गेले यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रमजान साटविलकर (वय.37) असे मृत तरुणाचे नाव आहे. यासोबतच दुसरा मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती.
या अपघाताचे वृत्त असे की, रमजान हे त्याची दुचाकी घेऊन नांदगावमार्गे फोंडाघाटच्या दिशेने जात होते. यावेळी वाशिनवाडी येथील धोकादायक वळणावर आले. त्यादरम्यान समोरुन येणाऱ्या अर्जुन विलास जाधव, (वय २४ रा. नांदगाव वाशिनवाडी) हे नांदगाव तिठ्ठा येथे जात असताना दोघां मोटारसायकलमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेनतंर रमजान हे रस्त्यावर पडले तर अर्जुन हे साईडपट्टिवरील गवतात पडले. तर रमजान हे रस्त्यावर पडले असता याच दरम्यान तेथे देवगड येथून चिरे घेऊन निपाणीच्या दिशेने जाणा-या ट्रक जात असताना याच ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अपघाताची माहिती होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. तर ट्रक चालकने पळ काढत कणकवली पोलीस स्टेशन गाठले. यासोबतच गंभीर जखमी अर्जुन याच्यावर नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल करण्यात आले.