

चिपळूण शहर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढणार असलो तरी सन्मानपूर्वक निर्णय झाला तर कोणतीही अडचण आणणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. युद्धात आणि निवडणुकीत गाफील राहू नये म्हणून ही तयारी आहे, असे मत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
शुक्रवारी सायंकाळी उशिराने ना. सामंत चिपळूण दौर्यावर आले होते. यावेळी अतिथी हॉटेल सभागृहात रात्री उशिराने शिंदे सेना गटाच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकार्यांची सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ना. सामंत म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत; मात्र गाफील न राहता निवडणुका लढण्याची तयारी करा. सन्मानपूर्वक युती झाली की, योग्य ठिकाणी युतीतील उमेदवारांना संधी मिळेल, अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
पत्रकारांशी बोलताना ना. सामंत म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांना आपण निवडणुकीला सज्ज राहाण्याची सूचना केली. युद्धात आणि निवडणुकीत गाफील राहायचे नाही म्हणून स्वतंत्र लढण्याची देखील तयारी करण्यात आली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी केली आहे. त्या दृष्टीने त्या-त्या ठिकाणी तगडे उमेदवार शोधून ठेवले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संघटनेचे उपनेेते व माजी आ. सदानंद चव्हाण, माजी आ. संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदींनी गण व गटात बैठका घेऊन चाचपणी सुरू केली आहे. येत्या चार-पाच दिवसांत चिपळूण नगर परिषदेची निवडणूक लढविणार्या इच्छुकांना देखील संधी मिळणार आहे. संबंधितांच्या मुलाखती घेऊन त्यांची एकत्रित यादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविली जाणार आहे. तेथे योग्य तो निर्णय घेतला जाईल. संघटनेचा कारभार पारदर्शक आहे. आगामी निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार आहोत; मात्र ही युती सन्मानपूर्वक असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.