

रत्नागिरी : जिल्ह्यात शिवसेना मजबूत आहे तरीही निवडणुकीत काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवायचा आहे. युती असो अथवा नसो, भगवा फडकणार हे निश्चित आहे. जागा मर्यादीत आहेत, इच्छुक खूप आहेत. तिकीट देण्याचे सर्वाधिकार मुख्य नेत्यांना देण्यात आले आहेत. ना. एकनाथ शिंदे देतील तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागावे, अशी सूचना उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी केली.
रत्नागिरी येथे स्वा. सावरकर नाट्यगृहात बुथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. घरात बसून टीका करून पक्ष वाढत नाही, त्यासाठी कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागते. निमंत्रण आले की लगेच एकनाथ शिंदे रत्नागिरी येतात. येताना भरीव निधी देऊन जातात. साडेतीन वर्षांच्या कालखंडात 1800 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाला. त्यातून शहरांचा कायापालट होत आहे. यापुढेही अतिरिक्त निधी देऊन जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली या शहरांचा सर्वांगीण विकास करण्याची घोषणा ना.उदय सामंत यांनी केली.
पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. काही ठिकाणी काँक्रीटीकरण तर काही ठिकाणी डांबरीकरण केले जाईल. भविष्यात रत्नागिरी जिल्हा खड्डेमुक्त असेल, असा विश्वास ना.सामंत यांनी व्यक्त करत बुथप्रमुखांनी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहन ना.सामंत? ? यांनी केले. या मेळाव्याचे संपूर्ण ़श्रेय मंत्री उदय सामंत व त्यांच्या संपूर्ण टीमला देण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकार्यांच्या उपस्थितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मेळाव्याला गर्दी झाल्याने सावरकर नाट्यगृहात कार्यकर्त्यांना बसायला जागा नव्हती. जागा मिळेल तिथे कार्यकर्ते उभे राहिले होते, तितकेच प्रमुख नेते आणि पदाधिकार्यांची व्यासपीठावर गर्दी झाली होती. तुडुंब भरलेल्या गर्दीतून शिवसेनेचा मोठा जयघोष होत होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकणवासियांचे भरभरुन कौतुक केले, कै. बाळासाहेब ठाकरे आणि कोकणवासिय यांचे नाते हे जिव्हाळ्याचे, विश्वासाचे होते त्यामुळे कोकणवासियांना खर्या शिवसेनेला पाठबळ दिले. तुमच्या उपस्थितीवरुनच तुमचे शिवसेनेवरील प्रेम दिसून येते असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ताकदीने शिवसेनेचे बळ अधिक भक्कम केल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नाट्यगृहात उमटल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्ह्यातील माजी आमदार, ज्येष्ठ कार्यकर्तेही उपस्थित होते. शिवसेनेची कोकणातील या एकजूटीमुळेच 2024 निवडणूकीत मोठे यश मिळाले, असे मनोगत याठिकाणी व्यक्त करण्यात आले. गुरुवारी संपूर्ण नाट्यगृह परिसर भगवेमय झाले होते. मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी स्वत: मंत्री उदय सामंत कार्यक्रम सुरु असताना बाजूला येवून नियोजन करत होते. या नियोजनात राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, राजन साळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मेळाव्याला आलेल्या सर्व उपस्थितांना फराळ वाटप करुन दिवाळी निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.