

सुनील दाभोळे
चिपळूण शहर : चिपळूण शहरातील वर्दळीचा मोठा ताण असलेल्या मुख्य मध्यवर्ती चौकातील हायमास्टवरील एलईडी दिव्यांची दुरवस्था झाली आहे. सहा ते सात दिव्यांपैकी बहुतांश दिवे बंद पडले आहेत. परिणामी, गेल्या सहा महिन्यांपासून हा चौक ‘अंधारात चाचपडू’ लागला आहे; मात्र आता दिवाळीच्या मुहूर्तावर न.प.च्या विद्युत विभाग यंत्रणेने चौक ‘तेजस्वी प्रकाशा’ने उजळविण्यासाठी हायमास्टवर पणत्या, मेणबत्त्या लावून ‘तेजोमय दीपोत्सव’ साजरा करावा, अशी उपरोधिक टीका नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
सहा महिन्यांहून अधिक काळ मध्यवर्ती चौक असलेल्या हायमास्टवरील एलईडी दिवे हळूहळू बंद पडू लागले आहेत. सुमारे सहा-सात एलईडी दिवे असून त्यापैकी केवळ ‘दीड-दोन’ एलईडी दिव्यांचा स्वतःच्या भोवतीच उजळ प्रकाश पडतो. काही दिव्यांची नजर क्षीण होत चालली आहे तर काही दिवे शॉक लागल्यासारखे अधूनमधून थरथरत लुकलुकत आहेत. काही दिव्यांची नजर शून्यात टाकल्यासारखी आकाशाकडे वळली आहे. काही वेडेवाकडे झाले तर काहींच्या नजरा दृष्टीदोषसारख्या तिरळ्या झाल्या आहेत, काहींनी लाजेने मान खाली घातली आहे. नगर परिषदेत स्वतंत्र विद्युत विभाग आहे. स्वतंत्र अभियंताही आहेत. काही नागरिकांनी या बाबत तक्रारी करून वस्तूस्थिती निदर्शनास आणूनही संबंधित यंत्रणेला काम करण्यासाठी ‘डोक्यात प्रकाश पडला नाही’. या मुख्य चौकात वर्दळीचा मोठा ताण असतो. रात्री उशिरापर्यंत रहदारीवेळी पोलिस यंत्रणेला वाहतूक नियंत्रणासाठी राबावे लागते; मात्र चौक ‘अंधारात चाचपडत’ असल्याने पोलिसांची वाहतूक नियमन करताना तारांबळ उडते. चौकात वाहतूक नियमनसाठी पोलिस कर्मचार्यांचा विचार करून न.प.ने किमान कर्मचार्यांना नाईट व्हिजन चष्मे दिल्यास वाहतूक नियमन करणे सोपे जाईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
दृष्टी अधू होत चाललेल्या हायमास्टवरील एलईडी दिव्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी विद्युत विभाग यंत्रणेने निदान या दिवाळीच्या मुहुर्तावर हायमास्टवर पणत्या, मेणबत्त्या लावून हा हायमास्ट झगमगावा आणि हा चौक तेजस्वी प्रकाशाने उजळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतानाच या दिवाळी पहाटेला न.प.ने याचे नियोजन हाती घ्यावे, जेणेकरून दिवाळीचे एक-दोन दिवस का होईना शहरातील नागरिक ‘तमसो मां ज्योतीर्गमय्’ अशी प्रार्थना करून अंधःकारातून प्रकाशाकडे चौकाची दोन दिवसांसाठी तरी वाटचाल होईल.