

राजापूर: राजापूर तालुक्यातील रायपाटण, टक्केवाडी येथील वैशाली शांताराम शेटे (वय ७४) या वृद्ध महिला त्यांच्या राहत्या घरी अचानक मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण गावात मोठी खळबळ उडाली आहे. हा आकस्मिक मृत्यू नसून काहीतरी घातपात असल्याच्या संशयाने पोलीस तपास वेगाने सुरू झाला आहे.
श्रीमती वैशाली शेटे यांना सोमवारी (दि.१३ ऑक्टो) वाडीतील लोकांनी शेवटचे पाहिले होते, मात्र त्यानंतर त्या दिसल्या नाहीत. यामुळे संशय आल्याने बुधवारी (दि.१५) सकाळी वाडीतील एका महिलेने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा जोरात ढकलून उघडला असता, वैशाली शेटे घरात मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे रायपाटण, टक्केवाडी येथे मोठी गर्दी जमली होती, दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर मयत महिला घरी एकटीच रहात होती. अन्य कुणी घरात नव्हते. घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा-राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ तपास सुरू केला.
या गूढ मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलली आहेत. फॉरेन्सिक टीम (न्यायवैद्यक पथक), श्वान पथक आणि एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) च्या पथकाला रायपाटणमध्ये पाचारण करण्यात आले आहे. या पथकांच्या मदतीने पोलीस कसून तपास करत असून या घटनेमागील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.