

रत्नागिरी : दिवाळीनिमित्त हजारो, लाखो प्रवासी आपआपल्या मुळगावी रवाना होण्यास सुरूवात झाली असून, रत्नागिरी विभागाच्या वतीने आरक्षित व जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. मात्र जिल्हांतर्गत एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांना लांजा, राजापूर, रत्नागिरी आगारासह विविध आगारातून ये-जा करण्यासाठी दीड ते दोन तास एसटीची वाट पहावी लागत आहे. बस वेळेत येत नसल्यामुळे वडाप किंवा मिळेल त्या मिनी बस, चार चाकीला हात दाखवून घर गाठावे लागत आहे. त्यामुळे सणासुदीत जरी लांब पल्ल्यासाठी जादा गाड्या सोडल्या असल्या तरी जिल्हा अंतर्गत प्रवासाचे नियोजन करणे अपेक्षित होते. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गणेशोत्सवानंतर दिवाळीत नोकरी, व्यवसायनिमित्त रत्नगिरी जिल्ह्यात असणारे चाकरमानी आपआपल्या मूळ गावी जात असतात. तर मुंबई, पुणे येथील चाकरमानी काही प्रमाणात येत असतात. रत्नागिरी विभागातून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासाठी दररोज 21 फेर्यांप्रमाणे 250 हून अधिक गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच विविध बसेसचे आरक्षण ही फुल्ल झाले आहे. त्यामुळे या सर्व बसेस विविध मार्गावर रवाना होत असून 6 नोव्हेंबरपर्यंत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मात्र, दिवाळी निमित्त जादा गाड्या बाहेर सोडल्यामुळे जिल्हांतर्गत एसटी बससेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. मागील दोन दिवसांपासून एसटी बसेस वेळेवर येत नाही. विशेषत: सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरी -लांजा, रत्नागिरी राजापूर, रत्नागिरी- देवरूख, रत्नागिरी-चिपळूण यासह लांजा, राजापूर, कणकवली बसेस वेळेवर येत नाहीत. आल्यातर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. नाईलाजास्तव प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. काहीजण दुसर्या गाडीची वाट पाहत आहेत. मात्र, दुसरी बस येत नसल्यामुळे जादा पैसे देवून खासगी बसेसने प्रवास करीत आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील प्रवासी एसटी विभागावर चांगलेच संतापले आहेत. विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही.