Ratnagiri News : विनापरवाना वाहने चालवणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई

राजापूर पोलिसांनी 27 जणांवर वाहतूक नियमांचे उल्लंघनप्रकरणी केल्या केसेस दाखल
Ratnagiri News
विनापरवाना वाहने चालवणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई
Published on
Updated on

राजापूर : रानतळे येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी विनापरवाना वाहने आणत असल्याबद्दल आणि ती भरधाव, बेदरकारपणे चालवून इतरांना त्रास देत तसेच जीवाशी खेळत असल्याबद्दल राजापूर पोलिस ठाण्यात महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या तक्रार अर्जानुसार, राजापूर पोलिसांनी कठोर भूमिका घेत मंगळवारी धडक मोहीम राबवली आहे.

या मोहिमेदरम्यान, राजापूर पोलिस ठाणे येथील वाहतूक अंमलदार दीपक करजवकर व नितीन फाळके यांनी तत्परता दाखवत एकूण 27 विद्यार्थ्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केसेस दाखल केल्या. यापैकी नऊ केसेसमध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी 5 हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. विनापरवाना वाहन चालवणार्‍या मुलांसाठी आता पालकांनाही जबाबदार धरले जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांच्या बेजबाबदार आणि धोकादायक वाहन चालवण्यामुळे केवळ महाविद्यालयाच्या आवारातच नव्हे, तर सार्वजनिक रस्त्यांवरही अपघात होण्याची शक्यता वाढली होती, ज्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.

या महत्त्वपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिस ठाण्याकडून राजापूरवासियांना आवाहन करण्यात येत आहे की, सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना वाहने चालवण्यास देत असताना त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना आहे की नाही, याची खात्री करावी. त्याचप्रमाणे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आणि महाविद्यालयाच्या आवारात अत्यंत शिस्तबद्ध व व्यवस्थितरित्या वाहने चालवावीत, जेणेकरून इतरांना कोणताही त्रास होणार नाही किंवा कोणाचा जीव धोक्यात येणार नाही, याची समजही पालकांनी आपल्या मुलांना द्यावी. भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास पोलिस प्रशासन अधिक कठोर कारवाई करेल, असा स्पष्ट इशाराही दिला आहे. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news