

देवरूख : आगामी नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रसिद्ध झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील मतदार यादीत मोठा घोळ झाला आहे. सुमारे 300 मतदारांची यादीतील नावे उडाली असून याचप्रमाणात बोगस मतदारांची नावे नोंदवली आहेत. या यादीतील त्रुटी दूर करून निवडणूक घ्यावी, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारू वा न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा महाविकास आघाडीचे नेते व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माने यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असल्याने या कार्यक्रमांतर्गत प्रभागानुसार मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीची पडताळणी केली असता, महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. ही बाब पुराव्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या मतदार यादीमध्ये अनेक घोळ घालण्यात आले आहेत. ठराविक पक्षातील नेत्यांनी निवडणूक यंत्रणेला हाताशी घेऊन हा घोळ घातला असल्याचा आरोप माने यांनी केला आहे.
या यादीमध्ये नोंदवण्यात आलेली मतदारांची नावे खोटी आधार कार्डचा आधार घेऊन नोंदवली आहेत. यामध्ये गणेश मंडल यांचे मतदार यादीत नाव असून हे मतदार पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून त्यांच्या आधार कार्डवर असाच पत्ता आहे. याचप्रमाणे जुमा शहा यांचेदेखील मतदार यादीत नाव असून त्यांचेही आधार कार्ड तपासले असता, या बिहारमध्ये वास्तव्याला आहेत व तसा त्यांचा आधार कार्डवरील पत्ता आहे.याचबरोबर यादी क्रमांक 291 मध्ये निहार योगेश मलुस्टे यांचा घर क्रमांक 4/69 बी वाणी वठार देवरुख असा आहे व व शर्विन सचिन गांगण यादी क्रमांक 291:4 बागवाडी 4 यांचाही घर क्रमांक 4/69 बी दाखवण्यात आला आहे. ही नावे वेगळ्या प्रभागात असली, तरीही त्यांचा घर क्रमांक एकच आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याची पडताळणी केली असता, या दोन्हीही व्यक्ती कायमस्वरूपी रत्नागिरी येथे वास्तव्याला आहेत, असे स्पष्ट झाले. याचबरोबर या दोन्ही व्यक्ती माजी नगराध्यक्षांचे नातेवाईक असल्याचेदेखील कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या मतदारांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले, त्या मतदारांची नावे डिसेंबर 2024 या एकाच महिन्यात तब्बल 74 नावे उडवण्यात आली आहेत. अशाप्रकारे संपूर्ण देवरुखची मतदार यादी पाहता सुमारे 300 मतदारांची नावे उडवण्यात आली आहेत. इतकीच बोगस मतदारांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी, संगमेश्वर तहसीलदार, निवडणूक नायब तहसीलदार, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दाद मागितली आहे.
या यादीतील त्रुटी दूर करून सुयोग्य यादी बनवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मोठे जन आंदोलन उभारू, असा इशारा माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी दिला आहे. मतदार यादीतील घोळ हे जाणून बुजून केले आहेत, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. हा संपूर्ण घोळ ठराविक 13, 14 व 15 या प्रभागांमध्ये जाणून बुजून घालण्यात आला आहे. या मतदार यादीतील अनेक मतदारांची नावे वर्षानुवर्षीच्या ज्या प्रभागामध्ये आहेत. यातील एका कुटुंबामधील ठराविक व्यक्तींची नावे अन्य प्रभागात टाकण्यात आली आहेत. हेदेखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे. एकाच प्रभागामध्ये 122 हरकती घेण्यात आल्या आहेत. हरकती घेण्याची मुदत शुक्रवारी संपली असल्यामुळे अनेकांना आपल्या हरकती मांडता आल्या नाहीत.
या संपूर्ण घोळ घातलेल्या यादी तील बीएलओ व कर्मचारी यांची सखोल चौकशी व्हावी, याचप्रमाणे बनावट आधार कार्ड बनवणार्या संबंधित सेंटर यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे, असे माजी राज्यमंत्री माने यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस महिला संघटक नेहा माने, महाविकास आघाडीमधील युयुस्तू आर्ते, उबाठाचे तालुकाध्यक्ष नंदादीप बोरुकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नीलेश भुवड आदी उपस्थित होते.