Ratnagiri News : राजापुरातील साखरीनाटे बंदर रूतलेय गाळात!

साखरीनाटे बंदरासह खाडी किनार्‍यातील गाळ उपसा; सोयीसुविधांसह अन्य उपाययोजनांसाठी सर्वेक्षण गरजेचे
Ratnagiri News
राजापुरातील साखरीनाटे बंदर रूतलेय गाळात!
Published on
Updated on

राजापूर : जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे बंदर ओळखल्या जाणार्‍या राजापुरातील साखरीनाटे बंदर वर्षांनुवर्षे साचलेल्या गाळामध्ये रूतले आहे. विजयदुर्ग खाडीपट्यामध्ये येणार्‍या तालुक्यातील नाणार-सागवेसह जैतापूर खाडीभागाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. वर्षांनुवर्षांच्या गाळसंचयामुळे किनार्‍यावरून बंदरातून होड्या घेऊन मासेमारीसाठी जाणे आणि जीव धोक्यात घालून मासेमारी केल्यानंतर बंदरात शिरणे हेच या मच्छीमारांसाठी आव्हानात्मक बनले आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या साखरीनाटे बंदरासह किनारपट्टीवरील खाडीभागामध्ये होणार्‍या मासेमारीवर अवलंबून असलेली या भागातील हजारो मच्छीमार बांधवांच्या कुटुंबांची उपजीविका अन् उदरनिर्वाह भविष्यामध्ये धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरीनाटे बंदरासह खाडी किनार्‍यातील गाळ उपसा, अत्यावश्यक सोयीसुविधांसह अन्य उपाययोजनांसाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्यानुसार तयार झालेल्या साखरीनाटे बंदरासह सागरी किनारपट्टी विकास आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

महत्त्वपूर्ण साखरीनाटे बंदर

राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागाला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारपट्टी लाभली आहे. याच किनारपट्टीवरील साखरीनाटे बंदराची रत्नागिरी जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे महत्वाचे मच्छीमारी केंद्र म्हणून ओळख आहे. या किनारपट्टीवर साखरीनाटे, सागवे, अणुसरे, कातळी, नाणार, दांडेअणसुरे आदी भाग येत असून या समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मच्छीमार व्यवसाय चालतो. या बंदर पसिरामध्ये सुमारे 250 ते 300 नोंदणीकृत छोट्या-मोठ्या मच्छीमारी नौका असून दररोज या बोटींमार्फत समुद्रात जाऊन मासेमारी केली जाते. देशभरातच नव्हे परदेशातही या भागातील मासळी निर्यात होऊन तिची विक्री होते. या मासेमारीतून दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. मासेमारी करण्यासह अन्य विविध स्वरूपाची कामे अनेक मच्छीमार बांधव या ठिकाणी करीत असून त्याच्यातून हजारो कुटुंबांची उपजीविका वा उदरनिर्वाह या मासेमारीवर अवंलबून आहे.

गाळामध्ये रूतले साखरीनाटे बंदर

डोंगरदर्‍यातून येणार्‍या नद्यांच्या पात्रातून वर्षांनुवर्षे वाहत येणारा गाळ बंदर परिसरामध्ये साचून राहीलेला आहे. बंदरामध्ये साचलेल्या गाळामुळे समुद्रामध्ये मच्छीमारीला जाताना होड्या लोटताना आणि मासेमारी करून परतल्यानंतर बंदरात येताना मच्छीमारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंदरामध्ये साचलेल्या गाळाचा उपसा व्हावा, अशी मच्छीमार बांधवांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र, बंदरामध्ये नेमका किती गाळाचा संचय झाला आहे याचे चित्र स्पष्ट होण्यासाठी अद्याप कोणतेही सर्वेक्षण झालेले नाही. त्याचवेळी शासनाकडून गाळ उपशाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे बंदरामध्ये साचलेल्या गाळ उपशा निर्णय गाळाच रूतलेला आहे.

गाळाने भरलेली जैतापूरखाडी

ब्रिटिश काळामध्ये राजापूरातून चालणार्‍या व्यापार्‍याच्या काळामध्ये जैतापूर खाडी परिसराला विशेष महत्त्व होते. त्या काळामध्ये राजापूर बंदरामध्ये येणारी मोठमोठी जहाजे आणि गलबते जैतापूर खाडीतून येत होती. सुरक्षित आणि सुलभ जलवाहतूक होण्याच्याद़ृष्टीने त्यावेळी जैतापूर खाडीचा भाग खूप खोल होता. मात्र, कालपरत्वे या खाडीपट्ट्यामध्ये मोठ्याप्रमाणात गाळाचा संचय झाला. हा गाळ उपसण्याकडे संबंधित झालेल्या दुर्लक्षामुळे या गाळाच्या प्रमाणात दरवर्षी अधिकच भर पडू लागली आहे. अशा स्थितीमध्ये गाळाने भरलेल्या या खाडीतून जहाजांची असलेली ये-जा सद्यस्थितीमध्ये बंद झाली आहे. त्यातून, ब्रिटिशकाळामध्ये नावारूपास आलेली ही जैतापूरची खाडी सध्या केवळ नावापुरती राहिली आहे.

बोटी अडकण्याच्या वारंवार घटना

मासेमारी करून परतल्यानंतर, बंदरामध्ये शिरताना जैतापूर सुरूबन आणि घेरा-यशवंतगड परिसरातील निमुळत्या खाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामध्ये बोटी अडकण्याच्या घटना वारंवार घडतात.विशेषतः ओहोटीच्या काळात ही समस्या अधिक तीव्र स्वरूप धारण करते. अनेकदा बोटी खाडीतच अडकून बसतात. त्यामुळे मच्छीमारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. या दरम्यान बोटीचे यांत्रिक नुकसान होण्यासोबत मोठ्या प्रमाणावर मासळीही खराब होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

धोक्याची सूचना देणारा टॉवर शोभेचाच

साखरीनाटे बंदराच्या सुरक्षेसाठी जैतापूर बंदर कार्यालयाच्या मागे बंदर विभागातर्फे एक टॉवर उभारण्यात आलेला आहे. टॉवरवर बावटा (ध्वज) लावून बंदारामध्ये मच्छीमारीसाठी जा-ये करणार्‍या मच्छीमार बांधवांना विविध मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. त्याचवेळी, धोक्याच्याही सूचना दिल्या जातात. मात्र, हा टॉवर साखरीनाटे बंदर परिसरातून अजिबात दिसत नाही. त्यामुळे हा बावटा केवळ नावापुरता ठरत आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने उभारलेला हा टॉवर प्रत्यक्षात उपयोगी पडत नसल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुरक्षेसाठी असलेली सुविधा जर मच्छीमारांनाच दिसली नाही तर त्याचा काय उपयोग ? असा थेट सवाल मच्छीमार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news