रत्नागिरी ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टी भागात आगामी दिवसात हलक्या सरींच्या स्वरूपात पावसाचे सातत्य राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारीही हलक्या सरींचा राबता सातत्याने सुरू होता. मंगळवारीही पावसाच्या हलक्या सरींची हजेरी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अनंत चतुर्दशीदिनी बाप्पांच्या निरोपाला पावसाची साथ राहणार आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असून आतापर्यंत 17 टक्के पाऊस अतिरिक्त झाला आहे. सोमवारी संपलेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 6.19 मि.मीच्या सरासरीने एकूण 55.71 मि.मी. पावसाची नोंद झाली.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर होता. मात्र, दुसर्या आठवड्यात पुरता ओसरला होता. मात्र, गणेश चतुर्थीनंतर पावासाने हलके सातत्य सुरू ठेवले होते. सोमवारीही पावसाची हलकी येजा सुरू होती. मात्र, दरम्यानच्या काळात वातावरण कोरडे झाल्याने तापमानातही वाढ झाली. मात्र, येत्या दोन दिवसात पुन्हा पाऊस सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागानेे वर्तविली असून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘यलो अलर्ट ’ जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाला अनुकूलता निर्माण होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या प्रभावाने किनारी भागात सोमवारी आणि मंगळवारी गुरूवार जोरदार पावसाची शक्यता आहे. दोन दिवसात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून यामध्ये किनारी भागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने दहा दिवसांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात येते. या कालावधीत गणेशघाटावर मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढते. या उत्साहामध्ये मंगळवारी पावसाचीही सोबत राहणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने चार हजारी सरासरी मजल गाठण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात 3945 मि. मी. च्या सरासरीने एकूण 35 हजार 500 मि.मी.ची एकूण मजल गाठली आहे. सोमवारी मंडणगड आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी 10 मि.मी. पावसाची नोंद झाली तर उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये 5 ते 6 मि मी. पावासाच्या सरींनी हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत पाच तालुक्यात पावसाने चार हजार मि.मी. पेक्षा जास्त मजल गाठली आहे तर चार तालुक्यात पवसाने पावणे चार हजार मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 117 टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी या कालावधीत पावसाला सरासरीही गाठता आली नव्हती. गतवर्षाच्या तुलतने या वर्षी 30 टक्के पावसाने आघाडी घेतली आहे.