

रत्नागिरी : साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे फटाके आता लवकरच फुटणार हे निश्चितच झाले आहे. जि. प. अध्यक्ष पाठोपाठ 9 पंचायत समित्यांच्या सभापतिपदाची तसेच दोन दिवसांपूर्वी नगर परिषद व नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांची आरक्षण सोडत पुन्हा झाली. बुधवारी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत यांच्या प्रभागांचे आरक्षण पूर्ण झाले. तर जि.प.चे 56 गट व प.स.112 गणांचे तसेच जिल्ह्यातील सर्व नगर पालिका व पंचायतींची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत यावर कोणाच्या हरकती किंवा सुचना असल्यास दाखल कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या नगरपरिषद व देवरुख, गुहागर, लांजा, मंडणगड, दापोली या नगर पंचायती यांचे नगराध्यक्षांचे आरक्षण सोडत दोन दिवसापूर्वी पार पडले. या नंतर बुधवारी या परिषद व पंचायतींचे प्रभाग आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षणामुळे काहींच्या स्वप्नांचा चुराडा झाला तर काही इच्छुकांच्या मनासारखे आरक्षण पडल्याने त्यांनी आनंद व्यक्तकेला.
गेल्या आठवड्यात जि.प.चे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. तर तसेच 9 पंचायत समिती सभापतींचे सुद्धा आरक्षण निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी बुधवारी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कार्यालयातील फलकावर, तहसीलदार मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर, पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीवर मतदारांना व नागरिकांना 14 ऑक्टोबर 2025 पर्यत हरकती किंवा सूचना संबंधित निवडणूक विभागाचे तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. दि. 14 ऑक्टोबर 2025 नंतर प्राप्त होणार्या हरकती किंवा सूचना संबंधित तहसीलदार यांच्याकडे विचारात घेतल्या जाणार नाहीत. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.