

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडून बेपत्ता झालेल्या नितीन शंकर पवार (वय 35, रा. हमरापूर, पेण जिल्हा रायगड) यांचा अजूनही शोध लागलेला नाही. गणपतीपुळे येथे सोमवारी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. नितीन पवार हे गणपतीपुळे येथे आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी आले होते. ते शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी समुद्रस्नानासाठी उतरले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते पाण्यात ओढले गेले आणि बेपत्ता झाले.
जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे तसेच गणपतीपुळे पोलिस चौकीचे कर्मचारी, जीवरक्षक, ग्रामरक्षक दल पोलिस पाटील, स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने नितीन पवार यांचा शोध सुरू होता. या घटनेनंतर अन्य पवार यांचे नातेवाईकही गणपतीपुळे येथे दाखल झाले आहेत. नितीन पवार यांना शोधण्यासाठी गणपतीपुळेबरोबरच नजीकच्या भंडारपुळे, मालगुंड, वरवडे, रीळ, उंडीपासून सुमारे वीस किलोमीटरच्या समुद्रकिनार्यावर त्यांचा शोध सुरू आहे.