

खेड : तालुक्यातील लोटे येथील वारकरी गुरुकुलात अल्पवयीन मुलीवरील विनयभंग झाल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रीतेश कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीने माध्यमांशी संवाद साधताना भावनिक प्रतिक्रिया देत कठोर शिक्षेची मागणी केली आहे. माझे आयुष्य उद्ध्वस्त झालेय अशा कृत्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे ती म्हणाली. या वक्तव्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भगवान कोकरे महाराज यांच्या पत्नी जयश्री कोकरे यांनी माध्यमांसमोर येऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गुरुकुल आणि गोशाळा बंद करण्यासाठी काही राजकीय व्यक्तींनी कारस्थान रचले असून हे आरोप खोटे आहेत. एका बाजूला पीडितेचा आक्रोश आणि दुसरीकडे कोकरे कुटुंबीयांचे स्पष्टीकरण या दोन्हीमुळे प्रकरणात गूढ निर्माण झाले आहे. वारकरी परंपरेशी जोडलेल्या संस्थेवर गंभीर आरोप झाल्याने नागरिक, वारकरी समूदाय आणि स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे. समाजात शांतता राखावी आणि तपासाची दिशा पोलिसांकडे सोपवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.