

चिपळूण : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळुणातील राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. शहरातील एक पुरोगामी विचारांच्या बड्या नेत्याने भाजपशी संधान साधल्याचे बोलले जात आहे. त्या नेत्याने थेट मुंंबई येथे जाऊन भाजपाचे एक मंत्री आणि बडे नेते यांच्याशी गुप्तगू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात चिपळूण न.प.च्या निवडणुकीत कोणते फासे पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चिपळूणचे राजकारण कायमचे जिल्ह्यासह कोकणात लक्षवेधी ठरले आहे. येथील राजकारणात कधी काही घडेल याचा नेम नाही. त्यामुळेच आता होणारी नगरपालिका निवडणूक देखील लक्षवेधी ठरणार आहे. प्रथमच ही निवडणूक दुभंगलेली राष्ट्रवादी आणि दुभंगलेली शिवसेना अशा राजकीय परिस्थितीत होणार असल्याने या निवडणुकीला अधिकच महत्त्व आले आहे. त्यात नगराध्यक्षपद सर्वसाधारण उमेदवारासाठी खुले असल्याने आणि नागरिकांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक चुरशीची लढत चिपळूणमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने आतापासूनच राजकीय पक्षांनी आपले धागेदोरे बांधायला सुरुवात केली आहे. त्या द़ृष्टीने शहरामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपल्या बैठकीत माजी आ. रमेश कदम यांना उमेदवारी देण्याचा ठराव केला आहे; मात्र या बाबत आघाडीत एकमत नसून काँग्रेसकडून लियाकत शाह नगराध्यक्ष पदासाठी आक्रमक आहेत.
दुसर्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिलिंद कापडी यांचे नाव चर्चिले जात आहे तर शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून उमेश सकपाळ व सुधीर शिंदे हे इच्छुक आहेत. त्यामध्ये सुधीर शिंदे यांनी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवू असाही इशारा दिला आहे. इतकेच काय त्यांनी अन्य पक्षातदेखील चाचपणी सुरू केली आहे; मात्र भाजपाकडून अद्याप कोणत्याच इच्छुक उमेदवाराला ‘कामाला लागा’ असा आदेश आलेला नाही. भाजपातर्फे देखील शहरातील पाच ते सहाजण इच्छुकांच्या शर्यतीत आहेत; मात्र भाजपाने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. नुकताच खासदार नारायण राणे यांचा जनता दरबाराच्या निमित्ताने चिपळूणमध्ये दौरा झाला. त्या पाठोपाठ पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरामध्ये आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक घेतली.