

रत्नागिरी : दसरा, दिवाळी सणासुदीच्या काळात अन्नात भेसळ होऊ नये, तसेच ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई, अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे. दरम्यान, अन्न प्रशासनाच्या रत्नागिरी कार्यालयाच्या वतीने एकूण 20 विशेष तपासण्या करून 16 अन्न नमुने घेण्यात आले होते. मिठाईत भेसळ केल्याप्रकरणी 5 दुकानांवर कारवाई करीत 38 हजारांचा दंड वसूल करण्यात आला, तर एक दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनच्या वतीने देण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांकडून मिठाई तसेच अन्न पदार्थ दूध, खवा, मावा, रवा, मैदा, आटा, खाद्य तेल यांची मोठी मागणी असते. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. 20 विशेष तपासण्या करण्यात आल्या. 16 अन्न नमुने घेण्यात आले. त्यामध्ये मिठाई, खवा, खाद्यतेल, पनीर, पोहा, चिवड इ. नमुने घेऊन लॅबमध्ये टेस्ट करण्यात आले. यामध्ये अन्न सुरक्षेच्या कायद्यात उल्लंघन केल्याप्रकरणी 5 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार टीम तैनात केल्या असून दुकानांची तपासणी सुरू आहे. संशयित मिठाईसह इतर पदार्थांचे नमुने घेण्यात येत आहेत. सणासुदीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात 196 अन्न परवाने देण्यात आले असून 771 नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.