

रत्नागिरी ः रत्नागिरी नगर पालिकेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभागांची आरक्षण सोडत करण्यात आली. यामध्ये यापूर्वीच्या माजी नगरसेवकांना नव्याने संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरीही माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांचा प्रभाग क्रमांक 5 नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांना नव्या प्रभागाची शोधाशोध करावी लागणार आहे, तर प्रभाग क्रमांक 15 तेलीआळी येथील निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.
रत्नागिरी नगरपालिकेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी रत्नागिरी नगरपालिकेच्या संत गाडगेबाबा सभागृहात चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रत्येक प्रभागात एक महिला व एक पुरूष असे आरक्षण काढताना पाच ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 11 ठिकाणी सर्वसाधारण स्त्रियांसाठी प्रभाग आरक्षित करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 1 हा परटवणे परिसरात असून तेथे सर्वसाधारण स्त्री व पुरूष असे आरक्षण पडल्याने माजी नगरसेवक रोशन फाळके यांचा मार्ग सुकर झाला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये स्मितल पावसकर, निमेश नायर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये माजी नगरसेवक बंड्या साळवी एंट्री? ? करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा प्रभाग क्रमांक 5 हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तेथे युवा नेते सौरभ मलुष्टे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर उबाठाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनाही अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.
प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे आहेत. तर प्रभाग क्रमांक 7 मधून संजय हळदणकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये बाळू साळवी यांचे नाव निश्चित आहे. तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसुचित जाती सर्वसाधारणसाठी आरक्षण पडल्याने तेथे वैभवी खेडेकर उभ्या राहणार की विजय खेडेकर स्वतः निवडणूक लढवणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजू तोडणकर, मानसी करमरकर, प्रभाग क्रमांक 11 मध्ये समीर तिवरेकर, प्रभाग क्रमांक 12 मध्ये राकेश नागवेकर, मीरा पिलणकर, प्रभाग क्रमांक 13 मध्ये सोहेल साखरकर, उबाठाकडून रशिदा गोदड, प्रभाग क्रमांक 14 मध्ये बंटी कीर, संपदा तळेकर, बाबू तळेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक 15 हा तेलीआळी परिसरात असून येथील एक जागा सर्वसाधारण तर दुसरी ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. सर्वसाधारण जागेवर भाजपमार्फत मुन्ना चवंडे, शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांचे सुपुत्र अथर्व साळवी, भाजपच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, दादा ढेकणे, उबाठामार्फत राजश्री शिवलकर इच्छुक असल्याने दोन्ही जागांवर रस्सीखेच पाहायला मिळणार आहे तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये सोहेल मुकादम यांचा मार्ग मोकळा झाला आहे. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत हे आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षण सोडत काढत असताना, अनेकांचे चेहरे चिंतातूर दिसून आले.