

रत्नागिरी : आंबा, काजूच्या विमा परताव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या बागायतदारांसाठी खुशखबर असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याची 100 कोटी 61 लाख 14 हजार 593 इतकी रक्कम झाली आहे. जिल्ह्यातील 36 हजार 468 आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. टप्प्याटप्याने रक्कम जमा होईल. ऐन दिवाळीच्या तोंडावर विमा परतावा मिळाल्यामुळे बागायतदारांत आनंदाचे वातावरण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण बदलामुळे आंबा-काजू बागायतदारांचे होणारे नुकसान भरून निघावे यासाठी केंद्र-राज्य सरकारने फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 30 हजार 135, तीन हजार 333 काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता. एकूण 18 हजार 24 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. शेतकर्यांनी हप्त्यापोटी 21 कोटी 74 लाख भरले, तर केंद्र राज्य आणि शेतकरी मिळून एकूण 108 कोटी 54 लाख रूपये विमा कंपनीला देण्यात आले होते. हंगाम संपल्यानंतर 15 दिवसांत ट्रिगरची माहिती संकलित करून 45 दिवसांत परतावा देणे गरजेचे होते. मात्र तीन महिने होऊनसुध्दा कंपन्याकडून कोणतीच हालचाल झाली नाही. सिंधुदुर्गात आंदोलन झाले, बैठका झाल्यानंतर सिंधुदुर्गात परतावा मिळाला. त्यानंतर रत्नगिरी जिल्ह्याला परतावा मंजूर झाला असून टप्प्या टप्प्याने परताव्याची रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा होत आहे.
रत्नागिरी तालुक्यात काजूसाठी एकाही बागायतदाराला विमा परतावा मंजूर झालेला नाही. तसेच सर्वाधिक आंबा क्षेत्र असलेल्या या तालुक्यात तुलनेने विमा रक्कमही कमी मिळालेली आहे. संगमेश्वर, लांजा, मंडणगड या तालुक्यांमध्ये आंबा क्षेत्र कमी असतानाही अधिक परतावा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. पाली, पावस परिसरातही परतावा रक्कमेतील तफावत येत आहे.