

चिपळूण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सद्यस्थितीत स्वबळाची तयारी करत आहेत. प्रत्यक्ष आपापल्या परीने या निवडणुकीच्या द़ृष्टीने सामोरा कसा जाईल याची तयारी सुरू झाली आहे. पक्षाच्यावतीने उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाली आहे, तर कार्यकर्त्यांच्या बैठका रंगू लागल्या आहेत; मात्र अद्याप जिल्ह्यात महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये समन्वय झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने स्वबळाची भाषा करीत आहे.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेत निवडणुकीच्या माध्यमातून धुरळा उडणार आहे. त्या द़ृष्टीने राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात किंवा मतदारसंघात घिरट्या घालू लागले आहेत. मतदारांच्या गाठीभेटी, छोटेखानी बैठका आणि संपर्क वाढवला जात आहे. नुकत्याच काँग्रेसच्या माध्यमातून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात किंबहुना रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खा. नारायण राणे यांच्या पुढाकाराने जनता दरबाराच्या माध्यमातून लोकसंपर्क वाढवण्यात आला आणि निवडणुकीच्या द़ृष्टीने एकप्रकारे चाचपणीच झाली. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक देखील झाली. पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली आणि आमची स्वबळाची तयारी आहे असेही स्पष्ट केले. महायुतीमधील पक्ष एकमेकांना इशारा देत आहेत. महायुतीमध्ये अद्याप जिल्हास्तरावर कोणताही समन्वय झालेला नाही किंवा समन्वय समितीदेखील नेमलेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहे. नगरपालिका, जि. प. व पं.स.साठी इच्छुक उमेदवार तयार केले जात आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये अजूनही समन्वय न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
दुसर्या बाजूला महाविकास आघाडी निवडणुकीच्या द़ृष्टीने तयारीला लागली आहे. मात्र आघाडीच्या माध्यमातूनही कोणताही समन्वय अद्याप झालेला नाही. महायुतीप्रमाणेच आघाडीमध्ये देखील समन्वयाचा अभाव आहे; मात्र आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा हे तिनही पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहेत. त्या द़ृष्टीने शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी गुहागर, चिपळूणमध्ये बैठका सुरू केल्या आहेत. रत्नागिरीमध्ये उपनेते बाळ माने कामाला लागले आहेत. चिपळूणमध्ये काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचाच असा दावा केला आहे तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून आघाडीत संघर्ष पाहायला मिळत आहे.
अद्याप शिवसेना ठाकरे गटाने या बाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे जिल्हाभरात आघाडीत अद्याप समन्वय पाहायला मिळत नाही. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत हे नगराध्यक्ष पदासाठी आग्रही राहाणार हे स्पष्ट आहे; मात्र आघाडी किंवा महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अद्याप समन्वय झालेला नाही. या पक्षांना निवडणुकीची तारीख जाहीर होणे प्रतीक्षेत आहे. एकदा निवडणूक जाहीर झाली की, प्रत्येक पक्ष आपापली भूमिका स्पष्ट करतील हे निश्चित आहे; मात्र सद्य:स्थितीत सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे.
जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात उत्तर रत्नागिरी व दक्षिण रत्नागिरी या दोन विभागात लोकसभा मतदारसंघ विभागले गेले आहेत. निम्मे चिपळूण रायगड लोकसभा मतदारसंघात व निम्मे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आहे. त्यामुळे जिल्ह्यात रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खा. नारायण राणे यांची ताकद महत्त्वाची ठरणार आहे. दुसर्या बाजूला पालकमंत्री उदय सामंत व राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विरोधी पक्षातील शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.
शिवसेनेच्या विभाजनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रथमच निवडणूक होत असल्याने गावखेड्यातील कार्यकर्ता पक्षाबरोबर आहे की नाही हे सिद्ध करणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे आ. जाधव आघाडीची मोट बांधण्यात यशस्वी होतात की नाही हे महत्त्वाचे असून दुसर्या बाजूला महायुती म्हणून पालकमंत्री उदय सामंत महायुतीसाठी कसे योगदान देतात हे महत्त्वाचे आहे; मात्र सद्यस्थितीत महायुतीमधील घटक पक्ष व आघाडीतील तीन घटक पक्ष स्वतंत्रपणेच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.