

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून धो-धो पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जगबुडी नदीची पातळी 6 मीटर इतका पाणीसाठा असून, इशारा पातळी ओलांडली आहे. उर्वरित नद्या तसेच धरणे तुडुंब भरली आहेत. पावसामुळे कोकणातील शेतकर्यांना भात लागवडीस दिलासा मिळाला असून जिल्ह्यात आतापर्यंत 94 टक्के भात लावणी झाली आहे. जुलै महिनाअखेर आतापर्यंत 18 हजार 275.58 मि.मी., सरासरी 2030.62 मि.मी. असे 60.36 टक्के इतका पाऊस झाला आहे, तर रविवारी सरासरी 49.68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्वचा पाऊस मे महिन्यात आल्यामुळे धो-धो पाऊस झाला. मान्सूनमध्ये पावसाने दमदार बॅटींग केली. नदी, धरणे भरलेली आहेत, तर मुसळधार पावसामुळे कित्येक घरांची पडझड झाली तर दरडी कोसळल्या, रस्ते खचल्यामुळे वाहतूक वळवण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आणि वीज पडून व्यक्तींचा मृत्यू झाला. आतापर्यंत साडेतीन कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसापासून जिल्ह्यात दिवस रात्र पावसाची हजेरी लावत आहे. दरम्यान, जून ते 27 जुलैपर्यंत आतापर्यंत 60.36 टक्के इतका म्हणजेच 18 हजार 275,2030.62 मि. मी. इतका सरासरी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच जुलैअखेर 25 हजार 392.84 मि.मी. पाऊस तर सरासरी 2821.43 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 83.97 टक्के इतका पाऊस झाला आहे.