

रत्नागिरी : जीएसटीचे दर कमी केल्यामुळे दसर्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी वाहन खरेदीसाठी मोठा उत्साह दाखवला. दिवाळी पाडवा हा साडेतीनपैकी एक असलेल्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी हजारो वाहनांची खरेदी केली आहे. उपप्रादेशिक रत्नागिरी विभागात एकूण 2 हजार 50 वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून 7 कोटी 33 लाख 49 हजार 928 इतका शासकीय महसूल आरटीओ कार्यालयास प्राप्त झाला आहे.
सरकारने जीएसटीचे दर कमी केल्यानंतर दसरा सणात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकीसह विविध वाहने खरेदी केली. त्यामुळे आरटीओ विभागास वाहन नोंदणीतून 5 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजा करून रत्नागिरीकरांनी वाहन घरी नेले. दरम्यान, दसर्यानंतर दिवाळीत ही नागरिकांना वाहने वेळेत मिळावी म्हणून वाहनांची नोंदणीकरण्यासाठी रत्नागिरी आरटीओ विभागाने योग्य नियोजन केले. तब्बल 2 हजार 50 वाहनांची नोंदणी झाली असून त्यातून 7 कोटी 33 लाख 49 हजार 928 इतका शासकीय महसूल प्राप्त झाला तर त्यापैकी 7 कोटी 4 लाख 47 हजार 928 नोंदणी शुल्क व करातून प्राप्त झाले असून 274 वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकातून 28 लाख 93 हजार इतकी रक्कम शासन जमा झाली आहे.
दसरा अणि दिवाळीच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी गाड्या खरेदी केल्या आहेत. दसरा मुहूर्तावर 1329 तर दिवाळीच्या मुहूर्तावर 2050 असे एकूण 3 हजार 379 वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागाला तब्बल 12 कोटींहून अधिक शासकीय महसूल मिळाला आहे.