गुहागर, पुढारी वृत्तसेवा: दाभोळवरून धोपावेला जाणाऱ्या पावणे चारच्या फेरीबोटमध्ये सरस्वती सकपाल (वय ५५ ) फेरीबोटमधून उतरत असताना फेरीबोटचा लोखंडी फाळका महिलेच्या पायावर गेल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली आहे. (Ratnagiri news)
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, दाभोळवरून पावणे चार वाजता सुटलेली फेरीबोट धोपावेला गेली असता एसटी पकडण्यासाठी या महिलेने घाई करुन जेटीला फाळका लागण्यापूर्वीच फेरीबोटीतून उडी मारली. मात्र, मागून येणाऱ्या फाळक्यात या महिलेचा पाय अडकला. आरडाओरड करताच मोटरमनने फेरीबोट मागे घेऊन थांबवली. त्यानंतर फेरीबोटवर असणाऱ्या नागरिकांच्या मदतीने महिलेला बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचला आहे. मात्र, महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे धोपावे फेरीबोटवर मोठा गोंधळ उडाला. या महिलेला दाभोळमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावर्डे डेरवणला हलवण्यात आले आहे. (Ratnagiri news)