

रत्नागिरी : शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. विशेषतः बस स्थानक ते जेलरोड पर्यंतच्या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच वाढलेल्या उकाड्यामुळे ही समस्या अधिकच त्रासदायक ठरत आहे. शहरातील बस स्थानक ते जेलरोड पर्यंतचा रस्ता हा शहराच्या मुख्य भागातून जातो. अनेक नागरिक, विद्यार्थी, तसेच व्यावसायिक कामांसाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्यामुळे आणि वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच बिकट होते. अनेकवेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचायला विलंब होतो.
ऑक्टोबर हिटमुळे सध्या रत्नागिरी शहरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. अशा उष्ण आणि दमट वातावरणात तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. गाडीच्या इंजिनचा आणि रस्त्यावरील उकाडा अशा दुहेरी त्रासामुळे अनेकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर पोहोचण्याच्या घाईत असणारे लोक आणि रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्यामुळे अधिक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. वाहनांची वाढती संख्या, काही ठिकाणी झालेले अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंग, तसेच वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी अपुरी पडणे ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत.
या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालक प्रशासनाकडे करत आहेत. पोलिसांनी गर्दीच्या वेळी विशेषतः बस स्थानक आणि जेलरोड परिसरात अधिक कर्मचारी नेमून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे. अतिक्रमण हटवून रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत पार्किंग त्वरित थांबवावी. तसेच, शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करणे आणि पर्यायी मार्गांचा विकास करणे आवश्यक आहे. रस्ते रुंदीकरणात अरुंद होत असून अर्धवट राहिलेली कामेही याला जबाबदार असून, नागरिक आता नगर परिषद प्रशासनाच्या नावाने बोटे मोडू लागली आहेत. रत्नागिरी पोलीस व नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना ट्रॅफिक त्रासातून मुक्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.