राजापूर : दरड कोसळून सुमारे 36 तास लोटले तरी बंद पडलेल्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्ववत होऊ शकली नव्हती. कोसळलेल्या दरडीतील भलेमोठे दगड हटविण्याचे काम दुसर्या दिवशी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु होते. रविवारी सायंकाळी उशिरापर्यन घाटमार्ग सुरळीत सुरु झाला नव्हता. मात्र, रविवारी उशीरापर्यंत घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्याबाबतचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर तसेच राजापूरला जोडणार्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली आणि घाट मार्ग बंद पडला. त्यानंतर घाटातील दरड हटविण्याचे काम सुरु होते. सुमारे 36 तास लोटल्यानंतर देखील घाट मार्ग सुरु झाला नव्हता. रविवारी सायंकाळी उशिरा घाटातून एकेरी वाहतूक सुरु करता येईल का? याबाबत प्रयत्न सुरु होते. मात्र, घाटात झालेला चिखल आणि ढासळलेले मोठमोठे दगड त्याला अडथळा ठरत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग दरड हटविण्याच्या कामात गुंतला आहे.
दरम्यान, अणुस्कुरा घाट बंद असल्याने राजापूर आगाराची एसटी वाहतूक गगनबावडा घाटमार्गे वळविण्यात आली होती. राजापूर आगारातून कोल्हापूर मार्गे पुणे, सांगली - तुळजापूर या मार्गावर दररोज एसटी सेवा सुरु आहे. ही सेवा गगनबावडामार्गे वळविण्यात आली.