रत्नागिरी : शासनाच्या 'सिंधुरत्न' योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काजू बोंडू प्रक्रिया आणि टसर रेशीम उद्योग यासाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती देण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मेळावे आयोजित केले आहे. त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काजू लागवड होत आहे; परंतु बोंडूवरील प्रक्रियेचे उद्योग नसल्याने बोंडू फेकून दिले जातात. या बोंडूवर प्रक्रिया करून त्याद्वारे आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने काजू बोंडू प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन आणि यंत्रसामग्री देण्यात येणार आहे. काजू बोंडूप्रमाणे जिल्ह्यात आईन वृक्षावर टसर रेशीम निर्मिती प्रकल्पास पोषक वातावरण आहे. जिल्ह्यात टसर रेशीम उद्योग प्रकल्प चांगले यशस्वी होऊ शकतात, या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या दोन्ही उद्योगांना ७५ टक्के अनुदान सिंधुरत्न योजनेतून देण्यात येणार आहे.
काजू बोंडू प्रक्रिया उद्योगाबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना आणि प्रस्तावित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच काजू बोंडू प्रक्रिया उत्पादनाला कोकण कृषी विद्यापीठामार्फत बाजारपेठेची उपलब्धताही करून देण्यात येणार आहे.