

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले विश्रामगृह प्रदीर्घकाळ बंद स्थितीत असल्याने त्याचा मुळ उद्देश असफल ठरत आहे. राजापूर दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे नुतनीकरण चालू असताना याच नगरपरिषदेच्या विश्रामगृहामध्ये राजापूरचे दिवाणी न्यायालय तात्पुरत्या स्वरुपात स्थलांरित करण्यात आले होते. परंतु, न्यायालयाच्या इमारतीचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर दिवाणी न्यायालय स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित झाल्यानंतर विश्रामगृहाची इमारत पुन्हा एकदा अनेक वर्षे विनावापर पडून आहे.
शासनाच्या युडी-6 या योजनेतून ‘क’ वर्गीय नगर परिषदांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाने राजापूर नगर परिषदेला सुमारे 18 वर्षापुर्वी विश्रामगृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार शहरातील जकातनाक्यालगत विश्रामगृहाची अत्यंत चांगल्या पध्दतीची इमारत बांधण्यात आली आहे.एकूण तीन सुट या विश्रामगृहात निर्माण करण्यात आले आहेत. त्यावेळी नव्याने तयार झालेल्या विश्रामगृहाचे भाडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठरविताना एक सुट शासकीय म्हणून राखीव ठेवला जावा, अशी अट टाकण्यात आली होती. त्याला नगरपरिषद प्रशासनाने हरकत घेतल्याने जिल्हा प्रशासन विरुध्द नगर प्रशासन असा वादही झाला होता. अखेर प्रकरण कोकण आयुक्तालयात गेले व तेथे जिल्हा प्रशासनाची ती अट रद्द करण्यात आली होती. आणि निकाल नगर परीषद प्रशासनाच्या बाजूने लागला होता.
त्यानंतर नगर परिषद प्रशासनाकडून त्या विश्रामधामची देखभाल होवू लागली. त्यासाठी ठेकेदार नियुक्त केला गेला. पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. विश्रामगृहातून मिळणार्या उत्पन्नापेक्षा होणारा खर्च मोठा असल्याने ठेकेदारांनी अर्धवट ठेका सोडून दिला. परिणामी विश्रामगृह बहुतांश बंद स्थितीतच असायचे. त्यातच एका ठेकेदाराकडून ठरलेले भाडे वेळेवर अदा न झाल्याने नगर परिषद प्रशासनाने त्याचा ठेकाच रद्द केला होता. त्यानंतर दीर्घकाळ हे विश्रामगृह बंद होते. दरम्यानच्या काळात राजापूर दिवाणी न्यायालयाची जीर्ण इमारत पाडून त्याजागी नव्याने भव्य इमारत बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आणि पर्यायी व्यवस्था म्हणून नगर परिषदेचे बंद अवस्थेत असलेले विश्रामगृह न्यायालयासाठी निवडण्यात आले. मात्र, दिवाणी न्यायालयाची इमारतीचे काम पूर्ण झाल्याने न्यायालय स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरीत झाले. तेव्हापासून पुन्हा या विश्रामगृहाला कुलूप लागले ते आजपर्यंत उघडलेले नाही. मागील अनेक वर्षे विनावापर पडून असल्याने सद्यस्थितीत या विश्रामगृहाची पार दुरवस्था झाली आहे.
आता या इमारतीच्या दुरुस्तीसाठी लाखों रूपये खर्च करावे लागणार आहेत. दरम्यान, ‘क’ वर्गात असलेल्या राजापूर न. प. च्या उत्पन्न वाढीसाठी शासनाने लाखो रूपये खर्च करून विश्रामगृह उभारले आहे. मात्र, ही इमारत सध्या विनावापर पडून असल्याने शासनाचा हेतू असफल ठरला आहे. मागील अनेक वर्षात न.प. प्रशासनाला अपेक्षित उत्पन्न या विश्रामगृहापासून मिळालेले नाही, हे वास्तव आहे.