खेड, पुढारी वृत्तसेवा : राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा पडणे, हे दुर्दैवी घटना आहे. पण त्या घटनेचे राजकारण होऊ नये, असे आम्हाला वाटत होते. परंतु, काँग्रेससह सर्वच आघाडीतील लोकांनी त्याचे राजकारण करून महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकण्याआधी महाराजांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव केला. त्यामुळे त्यांनी लिहिलेले संविधान हातात घेण्याचा काँग्रेस नेत्यांना अधिकार नाही. मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. ही वेदनादायी घटना होती. पण त्याचे राजकारण करणे योग्य नव्हते. प्रधानमंत्री मोदी यांनी सुद्धा महाराजांची माफी मागितली. या घटनेला जबाबदार लोकांवर कारवाई करण्याचा विश्वास आम्हाला होता तो महायुती सरकारने सार्थ करून दाखवला. परंतु काँग्रेस नेत्यांनी या घटनेचे राजकारण केल्याने महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, असे रामदास कदम म्हणाले.