

चिपळूण : चिपळूण तालुक्यात बुधवारी (दि.१५) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान तालुक्यातील मुर्तवडे बौद्धवाडी येथे वीज पडून तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. सुशील शिवराम पवार (वय ४१) असे या मृत तरूणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुर्तवडे गावात तसेच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेले काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी दुपारनंतर जोरदार हजेरी लावली. यावेळी तालुक्यातील मुर्तवडे बौद्धवाडी येथे सुशीलसह अन्य काहीजण शेतात काम करत होते. यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने शेतात वीज कोसळली. यामध्ये शेतात काम करत असलेल्या सुशीलचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असणारे उत्तम भिवा पवार (वय ६५), संतोष विठ्ठल कांबळे (वय ५५), संदीप लक्ष्मण पवार वय (वय ५२), सुलोचना कांबळे (वय ६५), सुजाता रामदास पवार (वय ३५) रोशन रामदास पवार (वय १९) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने डेरवण येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आले.