लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतील वायू गळतीची चौकशी सुरू

Gas leak investigation: प्रदूषण नियंत्रण मंडळ व फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्या पथकातर्फे कार्यवाही
Laxmi Organic gas leak
खेड : लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी.pudhari photo
Published on
Updated on

खेड : लोटे एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत शनिवार 22 रोजी सायंकाळी वायू गळतीची घटना घडली. या घटनेत एका कामगाराला वायूची बाधा झाली होती. रविवारी 23 रोजी सकाळी त्याला प्रकृती स्थिर झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले. या घटनेची चौकशी पोलिस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्या पथकाकडून सुरू करण्यात आली आहे.

शनिवारी दि. 22 रोजी सायंकाळी कंपनीत नियमित कामकाज सुरू असताना रिअ‍ॅक्टर गरम होऊन वायू गळती झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. वायू गळतीनंतर कंपनीतील कामगारांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले. तसेच, वायूबाधित कामगाराला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

रविवारी पोलिस, एमपीसीबी आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्या पथकाने कंपनीला भेट देऊन घटनेची पाहणी केली. वायू गळती कशी झाली, याची माहिती पथकाकडून घेतली जात आहे. तसेच, कंपनीच्या सुरक्षा मानकांचीही तपासणी केली जात आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वाहतूकही खोळंबली

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतील प्रॉडक्शन प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याचे अधोरेखित होत असून, या घटनेमुळे परिसरात घबराट देखील पसरली होती. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस यंत्रणेने तातडीने दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु घटनेला चोवीस तास उलट आले तरी अद्याप कोणतीही प्राथमिक नोंद न झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

दुर्घटनेनंतर आम्ही कुटुंबाप्रमाणे कामगारांची काळजी घेतली. ज्या कामगाराला अस्वस्थ वाटत होते त्याला आम्ही रात्रभर रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. शासकीय सर्व यंत्रणांना आम्ही सहकार्य करीत आहोत.

संदेश पाटोळे, एच. आर. व्यवस्थापक, लक्ष्मी ऑरगॅनिक लोटे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news