

जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून ते 5 ऑक्टोबर या चार महिन्यात पावसाने दमदार बॅटींग केली असून सरासरी 3 हजार 768.72 मि.मी. पाऊस झाला आहे तर 112.2 टक्के पावसाची नोंद झाली आहे तर गतवर्षी याचकालावधीत 4 हजार 198.46 पर्जन्यमान झाले तर 124.80 टक्के इतका पाऊस झाला आहे. एकंदरित, चार महिन्यात यंदा कोकणात तब्बल 12 टक्के पर्जन्यमान कमी झाल्याची नोंद आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. रत्नागिरीच्या इतिहासात मे महिन्यात एवढा पाऊस पडलाच नव्हता तेवढा पाऊस मे महिन्यात झाला. जून महिन्यात मान्सून कोकणात दाखल झाला.
जून, जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तर ऑगस्ट महिन्यात खर्या अर्थाने पावसाने हाहाकार माजवलेला पहायला मिळाला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल चार ते सहा नद्यांनी धोक्याची, इशारा पातळी ओलांडली होती. जिल्ह्यावर पूरपरिस्थिती ओढवल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर पावसाचा जोर ओसरला.
या वर्षीच्या पावसळ्यातील चार महिन्यात तब्बल 10 कोटींहून अधिक नुकसान झाले. रस्ते खराब झाले, दरड कोसळली, जीवित हानी झाली, घरे पडली, शाळा, महाविद्यालयांचे नुकसान झाले.
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवात पावसाचा जोर होता त्यानंतर नवरात्रोत्सवात काहीअंशी पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोरपूर्णपणे ओसरला असून पावसाची रिपरिप अजून देखील आहे. सप्टेंबर महिन्यात कोकणाचा पाऊस मराठवाडा,विर्दभ,सोलापूर जिल्ह्यात गेल्यामुळे त्याठिकाणी अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
एकंदरित, गतवर्षाच्या तुलनेत यंदा रत्न्ागिरी जिल्ह्यात 12 टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. सर्वाधिक पाऊस खेड, चिपळुणात चार महिन्यांमध्ये झालेल्या पावसात सर्वाधिक पाऊस हा खेड तालुक्यात 126 टक्के तर चिपळुणात 118 टक्के तर सर्वात कमी मंडणगडात 96.88 टक्के इतका पाऊस झाला आहे. मंडणगड वगळता सर्वच तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पावसाची बरसात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सार्वजनिक मालमत्ता, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूण 10 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांचे ही कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यात झालेल्या पावसामुळे भात पिके चांगली आली असली तरी कित्येक ठिकाणी पिके खाली पडत आहेत. काहीठिकाणी पाऊस झाल्यामुळे पिके वाहून गेली आहे.त्यामुळे यंदा भात पिकांना मोठा फटका बसणार असून उत्पन्न ही कमी होणार असल्याचे सांगण्यात आले.