

खेड : दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले होते. मात्र यावर्षी ते 15 दिवसांनी कमी करण्यात आले असून 20 ऑक्टोबरपासून समाप्त होणार आहे. त्यामुळे 21 ऑक्टोबरपासून नियमित रेल्वे फेर्या सुरू होणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गावर दरडी, मुसळधार पावसामुळे दृश्य मर्यादा कमी होणे, तसेच सुरक्षिततेसाठी गाड्यांचा वेग नियंत्रित ठेवावा लागतो. यंदा रोहा-ठोकूर दरम्यान 739 किमी पट्ट्यात विविध दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दरडी काढून टाकणे, लोखंडी जाळ्या बसवणे, तसेच सर्व सिग्नल यंत्रणांवर एलईडी दिवे बसवणे यामुळे रेल्वे सुरक्षेत सुधारणा झाल्याची माहिती देण्यात आली.
कोकण रेल्वेने यावर्षी 10 जूनऐवजी 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक सुरू केले व 31 ऑक्टोबरऐवजी 20 ऑक्टोबरपर्यंतच ठेवले आहे. त्यामुळे 15 दिवस आधीच नियमित वेळापत्रक सुरू होत आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, तेजस, जनशताब्दी, तुतारी, मंगळुरू एक्स्प्रेस आदी गाड्यांचे वेळापत्रक आता नियमित होणार आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणात जाणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.