Tourism | पर्यटन धोरणाचा सर्वात जास्त फायदा कोकणला

चिपळूण येथील जनसन्मान यात्रेत अजित पवार यांचे आश्वासन; कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर चिपळूण पूरमुक्त योजना राबविणार
पर्यटन धोरणाचा सर्वात जास्त फायदा कोकणला
पर्यटन धोरणाचा सर्वात जास्त फायदा कोकणलाFile Photo
Published on
Updated on

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

महायुती सरकारने नवीन पर्यटन धोरण विधेयक मंजूर केले आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर चिपळूण पूरमुक्त योजना राबविणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २१) दुपारी राष्ट्रवादी जनसन्मान यात्रा चिपळुणात दाखल झाली. ढोल-ताशे, डीजे आणि राष्ट्रवादीचे झेंडे आणि जयजयकारात ही यात्रा निघाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज पुतळ्याचे दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ झाला. या निमित्ताने बहादूरशेख ते सांस्कृतिक केंद्रापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.

यानंतर झालेल्या सभेला व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, महिला राज्याध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अजित यशवंतराव, रमा बेलोसे, दिशा दाभोळकर, शौकत मुकादम, दादा साळवी, मिलिंद कापडी, जयंद्रथ खताते, रमेश राणे, समीर काझी, नितीन ठसाळे, सूर्यकांत खेतले, मीनल काणेकर, राजेश बेंडल, अजय बिरवटकर, संदीप राजपुरे, डॉ. राकेश चाळके तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

पूरमुक्तीसाठी आराखडा मजूर करू चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर दोन हजार कोटींचा आराखडा आम्ही तयार करतो. त्याचा पाठपुरावा आ. शेखर निकम करीत आहेत. त्यामुळे तो आगामी काळात मंजूर करण्याचा शब्द देतो, असे आश्वासन जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळुणातील सभेत दिले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की कोकणाला ७२० कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. निसर्गान कोकणवर उधळण केलेली आहे. त्याचाच फायदा पर्यटन आणि उद्योग- व्यवसाय वाढवायला व्हायला पाहिजे. राज्यभरातील अनेक लोक येथे आता पर्यटनाला येत आहेत. त्यात अधिक वाढ व्हायला हवी. त्यातून मोठी रोजगारवाढ होईल. हॉटेल्स, चांगले जेवण, चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नवीन टूरिझम धोरण शासनाने आखले आहे. महायुतीचा उमेदवार द्याल त्याचे काम करू..!

आ. निकम यांचा उल्लेख

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आता कोणत्याही संकटांना घाबरायचे कारण नाही. या संकटांवर मात करायची. आ. शेखर निकम हे मोठ्या संकटातून बचावले. स्व. गोविंदराव निकम यांचा आशीर्वाद असल्याने आणि त्यांच्या सुदैवाने त्यांच्याबरोबर अन्य लोकदेखील बचावल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

पुराचा प्रश्न महत्त्वाचा

चिपळूणच्या दृष्टीने पुराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोल्हापूर, सांगलीच्या पूरनियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने पहिल्या टप्प्यात चार हजार कोटी रूपयांची योजना तयार केली आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात चिपळूणसाठी देखील अशी योजना आपण मंजूर करू, असे ठामपणे सांगितले. शेवटी आम्ही विकासकामे करण्यासाठी येथे आलो आहोत. स्व. गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेसारखी मोठी शिक्षण संस्था उभी केली. त्या माध्यमातून आज २५ हजार विद्यार्थी येथे शिकत आहेत. आ. शेखर निकम है निकम घराण्याचा वारसा कायम चालवित आहेत. त्यांनी अवघ्या चार वर्षात अडीच हजार कोटीची विकासकामे चिपळूण, संगमेश्वरमध्ये केली. अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे प्रलंबित प्रस्तावदेखील आपण मंजूर करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

लाडकी बहीणचे अनुदान वाढवू

लाडकी बहीण योजनेवर तेढ करणाऱ्या वक्तव्याचा विरोध विरोधकांनी अनेक आरोप केले. या योजनेची खिल्ली उडविली. मात्र, महिलांना मानसन्मान असतो ना? याचा त्यांनी विचार केला नाही. इतकेच नव्हेतर हे विरोधक योजनेविरोधात कोर्टातदेखील गेले. पुढच्यावेळी या योजनेच्या अनुदानात आणखी वाढ करू, असे त्यांनी सांगितले. तर विरोधक हीच योजना बंद करू असे सांगत आहेत. आजपर्यंत महिलांना अशाप्रकारची कोणीच मदत केली नव्हती, ती या सरकारने केली. चिपळूणच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्ग, पूरप्रश्न, येथील वाहतूक प्रश्न, पर्यटन असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर आ. शेखर निकम चांगले काम करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीला साथ द्या आणि ती तुम्ही नक्कीच द्याल, असा विश्वास व्यक्त केला.

तेढ करणाऱ्या वक्तव्याचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. जर कोणी समाजात तेढ करणारे वक्तव्य करीत असेल तर राष्ट्रवादी पक्ष त्या भूमिकेच्या विरोधात आहे. ती राष्ट्रवादी पक्षाची अजिबात भूमिका नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेतले. हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आ. शेखर निकम हे चिपळूण-संगमेश्वरवाल्यांचे लाडके आमदार आहेत. ते ज्या-ज्या वेळी माझ्याकडे विकासकामे घेऊन आले त्यावेळी त्यांना एकदाही रिकाम्या हाताने पाठविले नाही. त्यामुळे उर्वरित काळात देखील प्रलंबित कामे मार्गी लावू, त्यामुळे शेखर निकम यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीमध्ये कोण उमेदवार द्यायचा ते आम्ही ठरवू, आम्ही घड्याळाचाच उमेदवार देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले, जनसन्मान यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद लाभत आहेत. सर्व समाजबांधव हिंदू-मुस्लीम या यात्रेत सहभाग घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अजितदादांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राचा वादा अजित दादाच आहेत, असे त्यांनी सांगून शेखर निकम यांनी घाबरायचे कारण नाही, असा सूचक इशारा दिला.

अडीच हजार कोटींची विकासकामे

यावेळी आ. शेखर निकम यांनी आपल्या भाषणात गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. आपण चार वर्षांत अडीच हजार कोटींची विकासकामे केली. तिवरे धरण, चिपळूणची १५४ कोटींची पाणी योजना, पेठमाप पूल, सावर्डे, कोंडमळा येथील पाझर तलाव, अन्य पाणी योजना या माध्यमातून विकासकामांचा धडाका लावला आहे.

त्यामुळे जनतेने विकासाला साथ द्यावी. आपण दादांच्या पाठीशी उभे राहिलो. त्यांच्यामुळेच एवढा निधी आणता आला. मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना अशा योजना दादांमुळेच यशस्वी झाल्या. त्यामुळे आगामी काळात सरकारने गरीब कुटुंबातील भावांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती आ. निकम यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news