

चिपळूण शहर : चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या संकल्पनेतून वन विभागाच्या सहकार्याने तसेच आरजीपीपीएल, नेरोलॅक, नाम फाऊंडेशन, क्रेडाई, वाशिष्ठी डेअरी आदींच्या सीएसआर फंडातून कळंबस्ते येथे साकारत असलेल्या देवराई अंतर्गत बोटॅनिकल गार्डनचा पहिला टप्पा आकार घेऊ लागला आहे. या प्रकल्प अंतर्गत लागवड केलेली विविध प्रकारच्या झाडांना फुले बहरू लागली आहेत.
शहरानजीकच्या कळंबस्ते येथे शासनाच्या एका विस्तीर्ण जागेवर देवराई उभारण्याची संकल्पना काही महिन्यांपूर्वी पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी प्रत्यक्ष कृतीत आणण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने नाम फाऊंडेशनचे सहकार्य, वन विभागाचे मार्गदर्शन मिळत असून काही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देवराई उभी करण्यास सुरुवात झाली आहे. निसर्ग, पर्यावरणप्रेमी भाऊ काटदरे यांच्यासह काही पर्यावरणप्रेमींचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. प्रामुख्याने कोकण निसर्गसंपन्न आहे.
बहुतांश विविध प्रकारच्या वनस्पती व वृक्ष खासगी जंगल क्षेत्रात आहेत तर कोकणातील ग्रामीण भागातील गावातून देवस्थानसहीत शासकीय जागेतून देवरायांचे अस्तित्त्व आहे; मात्र आता कालानुरुप विविध कारणांनी या देवरायांचे अस्तित्त्व कमी होत आहे. ही बाब लक्षात घेता पर्यावरण रक्षणासाठी व दुर्मीळ होत चाललेली वृक्षसंपदा आणि देवरायांचे अस्तित्त्व पुन्हा निर्माण करण्याकरिता सर्व पर्यावरण व निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन कळंबस्ते येथे विस्तीर्ण जागेत देवराईची संकल्पना हाती घेतली. त्याच्या पहिल्या टप्प्यात बोटॅनिकल गार्डन अर्थातच विविध प्रकारची फुलझाडे लागवड करण्यास सुरुवात केली. या गार्डनला बहर आला आहे. अनेक प्रकारची दुर्मीळ होत चाललेली फुलझाडे या ठिकाणी पुनःनिर्माण करून अत्यंत आकर्षक पद्धतीने दुर्मीळ होत चाललेल्या फुलांचे बोटॅनिकल गार्डन येत्या तीन-चार महिन्यांतच नागरिकांसाठी खुले होणार आहे.
आजच्या काळात कोकणातील शहरे, काही प्रमाणातील ग्रामीण भाग विकसीत होत आहे. परिणामी, विकासकामांच्या अंतर्गत अपरिहार्य वृक्षतोड तसेच विविध प्रकारची फळे व फुलझाडांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. काही फुलझाडांची आयुर्वेदात औषधी म्हणून ओळख आहे; मात्र विकासाच्या वेगात परसदारी घराच्या सभोवती असलेली छोटी-छोटी फुलझाडे देखील दुर्मीळ होत चालली आहेत. ही बाब लक्षात घेता कोकणात असलेल्या सर्वप्रकारच्या फुलझाडांचे अस्तित्त्व पुन्हा निर्माण करण्याकरिता या बोटॅनिकल गार्डन संकल्पनेचा वाटा भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे.