

गुहागर शहर : तालुक्यातील शृंगारतळी-जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत असून त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. याबाबत ग्रामस्थांसह मनसेच्या पदाधिकार्यांनी आवाज उठविला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली. या रस्ता दुरूस्तीसाठी 23 लाख मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.
शृंगारतळी-जानवळे फाटा मार्गे गावात जाणार्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केली. यासंदर्भात गुहागर सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन दिले.यानंतर गुहागर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तत्काळ दखल घेत गुरुवारी उपअभियंता स्वप्निल पाटील व शाखा अभियंता रेणुका ओतारी यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, या रस्त्याचा प्रस्ताव सादर केला असून, प्रस्तावास तत्त्वतः मान्यता दिली आहे. सध्या हा प्रस्ताव तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात येईल, अशी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
रस्ता दुरुस्ती प्रस्तावात जानवळे-भडकंब-तळवली-मुंढर मार्ग दुरुस्तीस 23 लाखांचा निधी मंजूर झाले असून पुढील एक महिन्यात काम सुरू होईल, अशी खात्री उपअभियंता यांनी दिली. यावेळी जानवळे गाव अध्यक्ष कमलाकर वणगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश नर्बेकर, मनसे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, उपशाखा अध्यक्ष प्रवीण लांजेकर, गट अध्यक्ष राहुल रहाटे, अंजली जांभळे, प्रीती जांभळे, चंद्रकला बैकर, सुखदा तिवरेकर आदी उपस्थित होते.