

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह विविध तालुक्यांत बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट तसेच ढगांच्या गडगडाटात पावसाने दमदार बॅटिंग केली. अचानक झालेल्या परतीच्या पावसामुळे करबुडेतील कपिल वस्तूनगर तसेच शितपवाडीसह परिसरातील अन्य ठिकाणीही मोठे नुकसान झाले. यामध्ये एकूण 16 घरांना फटका बसला असून, शर्वरी तांबेे (वय 15) मुलीला विद्युत धक्का बसल्याने उपचारासाठी दाखल करावे लागले.
पावसामुळे या भागातील शाळेची भिंत कोसळली असून, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अभ्यासिका केंद्रावरील पत्रे उडाले, तर बौध्द विहाराच्या येथील पिंपळाचा जुना वृक्ष कोसळला असून दोन घरांवर वीज पडून मोठे नुकसान झाले. करबुडे परतीच्या या पावसामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
कोकणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरूवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख, संगमेश्वर, लांजा, राजापूर भागात दमदार पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात कपिल वस्तू नगर करबुडे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन घरांवर वीज पडली तर शाळा, वाचलनालयावरील पत्रे उडून गेले असून बौद्ध विहाराच्या येथील पिंपळाचा जुना वृक्ष कोसळला आहे.
करबुडे येथे परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याचे समजताच पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वीय सहायक नेताजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांना पाहणी करण्यासाठी आदेश दिले होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, तलाठी नेहा कांबळे, सर्कल स्मिता मालगुंडकर, सरपंच संस्कृती पाचकुडे, विभागप्रमुख प्रवणी पांचाळ, ग्रामसेवक डी. एस. सोनवणी यांनी घटनास्थळी दाखल होऊन नुकसान भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाने प्रभाकर जाधव, मिलिंद जाधव, शैला जाधव यांच्या घरावर वीज कोसळली, तर बुद्धविहार येथे पिंपळाचे मोठे झाड उन्मळून पडले. कपिल वस्तू नंबर एक शाळा येथे शौचालयाचे कंपाऊंड कोसळले. प्राची जाधव यांच्या घरावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावरील पत्रे उडाले. शंकर जाधव, राकेश जाधव यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून नुकसान झाले.