खेड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात दाभीळ नाका परिसरात पोलिस तपासणी अंतर्गत संशयास्पद हालचाल दिसलेल्या मोटारीची (शनिवार) दि.२६ रोजी रात्री उशिरा तपासणी करण्यात आली. यावेळी लाखो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुमारे पाच लाख रुपयांची मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी संशयित फरहान फारूक मोहमद पटेल (वय ३७, रा. अली पॅलेस, गोवळकोट रोड, पालोजी बाग, पेठमाप चिपळूण) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या विषयीची माहिती पोलिसांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने जिल्हाभरात प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग, सागरी पोलीस ठाणे, जिल्ह्यांच्या सीमा या सगळ्या भागांमध्ये करडी नजर आहे. त्यासाठी जिल्हाभरात भरारी पथक तैनात आहेत. वाहनांच्या संशयास्पद हालचाली या सगळ्यांवर करडी नजर आहे. जिल्हा पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अवैध दारू, शस्त्रे, हातभट्टी दारू, गुटखा विक्री, वाहतूक किंवा कब्जा बाळगणे अशा सर्व प्रकारचे अवैध प्रकारांवर धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून अवैध गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांचे एक पथक शनिवारी दि.२६ रोजी रात्री उशिरा तैनात होते. यावेळी एक मोटार ( एम एच ०२ बी जे ३३२९) पोलिसांनी अडवली. यावेळी केलेल्या तपासणीत प्रतिबंध करण्यात आलेल्या गुटखा केसर युक्त विमल पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत केसररयुक्त विमल पान मसाल्याचे एकूण सतरा पोती प्रत्येक पोत्यात प्रत्येकी बावीस पाकीट, त्या एका पाकिटाची किंमत १९८ रूपये किंमत असलेली एकूण ७४ हजार बावन्न रुपयांची पाकीट मिळाली.
टोबॅकोचे पोते त्यात ३८ पाकिटे त्या एका पाकिटाची किंमत ३० रूपये एकूण किंमत १,१४० रूपये, केसरयुक्त विमल पान मसाल्याचे १ पोते त्यात ३५ पाकीट त्या एका पाकीटाची किंमत १२० रूपये एकूण चार हजार दोनशे रुपये, व्ही-1 टोबॅकोचे आणखी एक पोते त्यात ६० पाकिटे त्या एका पाकिटाची किंमत ३३ रूपये एकूण किंमत एक हजार नऊशे रुपये, केसरयुक्त विमल पान मसालाचे आणखी एक पोते त्यात ६१ पाकिटे त्या एका पाकिटाची किंमत १८७ रूपये एकूण किंमत ११,४०७ रूपये, एम-सेंटड टोबॅकोचे गोल्डचे एक पोते त्यात ६ बॉक्स त्या एका बॉक्सची किंमत ६०० रूपये असे एकूण किंमत ३,६०० रुपये, प्रीमियम आर एम डी पान मसाल्याचे एक पोते त्यात ६ बॉक्स त्या एका बॉक्सची किंमत ९०० रूपये एकूण किंमत ५,४०० रूपये, व्ही १ तंबाखूचे २ पोते त्यातील प्रत्येकी पोत्यात दोन पाकीट असे एकूण १८ पाकीटे, प्रत्येकी पाकिटामध्ये २२ पाकीट, त्या एका पाकीटाची किंमत २२ रूपये एकूण किंमत ८,७१२ रूपये सुमारे १ लाख ७ हजार १११ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली सुमारे ५ लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कपंनीची झेन इस्टीलो मॉडेल असलेली चारचाकी मोटार जप्त करण्यात आली. या अवैध व प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, राजन सस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग यांच्या मार्गदर्शनानुसार खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस नितीन भोयर व त्यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.