Ratnagiri : बेकायदा मासेमारी रोखा, अन्यथा कार्यालयाला टाळे

शाश्वत मच्छीमार हक्क संघाचा मत्स्य विभागाला इशारा
Ratnagiri News
रत्नागिरी : मत्स्य अधिकार्‍यांशी चर्चा करताना पारंपरिक मच्छीमार.
Published on
Updated on

रत्नागिरी : सागरी जलदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्ससिननेट, एलईडी आणि मिनी पर्ससिनद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. याला सागरी सुरक्षा रक्षकांचा आशीर्वाद आहे. त्यांना आधी नोकरीवरून काढून टाका. चार मासे मिळावे, यासाठी ते कर्तव्य बासणात गुंडाळत आहेत. पारंपरिक मच्छीमारांच्या 10 वावामध्ये मासेमारी करणार्‍या नौका मत्स्य खात्याच्या ड्रोन कॅमेर्‍यामध्ये येतात. मग 5 वावात पर्ससिनद्वारे मासेमारी करणार्‍या नौका का दिसत नाही, असा आक्षेप घेत यावर कारवाई झाली नाही तर आता आमचाही संयम ढळेल. मग एकदा आम्ही कायदा हातात घेतला तर कार्यालयाला देखील टाळे ठोकू, असा इशारा शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजित ऊर्फ छोट्या भाटकर यांनी रत्नागिरी येथील सहायक मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांना दिला.

राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजेच 12.5 नॉटीकल मैलच्या आतील समुद्रात पर्ससीन व मिनी पर्ससीनद्वारे मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशारा असल्याने पारंपरिक मच्छीमार नौका बंदरातच होत्या. या सर्व घडामोडींमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आला आहे. त्यात एलईडी मासेमारी, मिनी पर्ससिननेट मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी नौकांवर कारवाई केली जात नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे शिष्टमंडळ सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकले.

रत्नागिरीतील कर्ला, राजीवडा, मिरकरवाडा, जयगड, नाटे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी सुरू आहे. या ठिकाण मत्स्य विभागाचे सागरी सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहेत, परंतु ते सुरक्षेचे काम करताना दिसत नाहीत. त्यात परवानाअधिकारी नियमाने वागत नाहीत. किनार्‍यावर क्रेनने बोटीमध्ये जनरेटर चढवले जाते, एवढी मोठी क्रेन दिसत नाही का, याचा अर्थ सर्वांच्या आशीर्वादाने एलईडी मासेमारी सुरू आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य पार पाडत नसतील तर त्यांना कामावरून काढुन टाका. बोटीवाले मासे देतात म्हणून बेकायदेशीर मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, ही गंभीर बाब असल्याचा आरोपही त्यांनी केला. पर्ससीनला परवानगी नसल्याने ट्रॉलरवर पर्ससीनचे सामान ठेवून काहीजण बेकायदा मासेमारी करीत असल्याचाही आरोप यावेळी मच्छीमारांनी केला.

दहा वावापर्यंत आम्ही मासेमारी करताना ड्रोन कॅमेर्‍यामध्ये आमच्या नौका दिसतात. मग 5 वावामध्ये पर्ससिन मासेमारी करणार्‍या नौका का दिसत नाहीत. आम्हाला जे दिसते ते मत्स्य विभागाला का दिसत नाही. याचा अर्थ मत्स्य विभाग जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आता आमचा संयम ढळत चालला आहे. आम्हाला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. आम्ही कायदा हातात घेतला तर कुचकामी ठरलेल्या मत्स्य विभागाला देखील टाळे ठोकू, असा ईशारा संघाच्या पदाधिकार्‍यांनी मत्स्य विभागाला देत मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी प्रभारी सहाय्यक मत्स्य अधिकारी स. वि. कासेकर म्हणाले की, शास्वत मच्छीमार हक्क संघाचे शिष्टमंडळ आम्हाला भेटले. बेकायदेशीर एलईडी, पर्ससिननेट आणि मिनी पर्ससिनेट मासेमारीबाबत त्यांचा आक्षेप आहे. अशा बेकायदेशीर मासेमारीवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news