

रत्नागिरी ः कोकणाने कायम शिवसेनेवर प्रेम केले आहे. जेव्हा जेव्हा सत्ता येते तेव्हा कोकणी जनतेला भरभरून देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कोकणाने आठ आमदार शिवसेनेला दिले, ही कोकणी जनतेची ताकद आहे. कोकणची जनता हे शिवसेनेचे ऐश्वर्य आहे. बाळासाहेबांच्या विचारांची संपत्ती सोबत घेत येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रत्नागिरीतच नव्हे तर संपूर्ण कोकणात भगवा फडकणार आहे. आपल्याला सावध रहायचे आहे. विरोधक कमजोर असले तरी कपटी आहेत हे लक्षात ठेवून शिवसैनिकांनी निवडणुकीत काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केले.
रत्नागिरी शहरातील वि. दा. सावरकर नाट्यगृहात रत्नागिरीतील बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री ना. उदय सामंत, गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, आ. रवींद्र फाटक, आ. किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, राजन तेली, संजय कदम, सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, जयसिंग घोसाळे, राजेंद्र महाडीक, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री असतानाही येत होतो. आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही रत्नागिरीत येतोय. पक्षाचा प्रमुख म्हणून नव्हे तर तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलोय. मी प्रमुख असलो तरी तुम्ही शिवसेनेची ताकद आहात. कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे. बाळासाहेबांचे विचार कोकणातील घराघरात पोहोचले आहेत. कोकणी जनतेने बाळासाहेबांच्या विचारांची संपत्ती जपून ठेवली आहे. 1997 पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. यापुढील 56 वर्षे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकत राहील, असा विश्वास ना. शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेने कायम जनतेच्या दुःखात जाऊन त्यांना मदत करण्याचे काम केले. अतिवृष्टी, पूर, आतंकवादी हल्ले येथे सर्वप्रथम शिवसैनिकच पोहोचतो. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात मदतीचा हात देणारी शिवसेनाच होती. आम्ही केवळ दौरे करत नाही तर मदतही करतो, असा टोला ना.शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमातून आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या अभियानाचा राज्यातील 5 कोटी नागरिकांना फायदा झाला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मदत करता आली. विरोधकांनी न्यायालयात जाऊन योजनेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने फटकारल्यानंतर योजना सुरूच राहिली. यापुढेही योजना सुरू राहणार आहे. विरोधकांनी कितीही फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला तरी महिलाच त्याला निवडणुकीद्वारे उत्तर देतील, असा विश्वास ना.शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री असताना आपण थेट जनतेमध्ये जात होतो. काहींनी घरातून मुख्यमंत्रीपद सांभाळले. जनतेला थेट भेट घेणारा मुख्यमंत्री हवा होता. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत 60 आमदार निवडून दिले. आता विरोधकांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे. पराभव झाला की ते आयोगावर आरोप करतात. यश मिळाले की ईव्हीएम मशीन चांगली असते, असेही ना. शिंदे म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चौफेर जोमाने मुसंडी घेत आहे. तरीही थांबू नका. वाडीतील प्रत्येक घराघरात पोहोचा. निवडणूक आली की आमची आठवण होते, असे बूथप्रमुखाला वाटणार नाही. इतका मानसन्मान बूथप्रमुखाला पक्षामार्फत दिला गेला पाहिजे. निवडणुकीत सतर्क रहाणे आवश्यक असते. महायुती म्हणून कोकणातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्याचा निर्धार करून कोकणचा कायापालट करूया, अशी गर्जना ना.शिंदे यांनी केले. ना. शिंदे यांच्या भाषणापूर्वी गृह राज्यमंत्री ना.योगेश कदम, आमदार निलेश राणे यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडेही लक्ष द्या, अशी विनंती निलेश राणे यांनी ना.शिंदे यांना केली. यावर ना.शिंदे यांनी, उदय सामंत तुम्ही बॉर्डरवरती आहात, सिंधुदुर्गातही लक्ष घाला, अशी सूचना ना.सामंत यांना केल्या.
आपल्या भाषणात ना. एकनाथ शिंदे यांनी उबाठाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. विधानसभेलाही धनुष्य होते आणि आताही आपल्याकडे धनुष्य असून हे यापुढे विरोधकांवर वेगाने चालेल आणि त्यांची पळताभुई थोडी होईल असे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र येत असल्याबद्दल त्यांनी म्हटले की इज्जत गेली गावाची आणि आठवण आली भावाची अशी काहींची अवस्था झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.