

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवळे बाजारपेठेतील सुनंदा मेडिकल स्टोअर्सला शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. शनिवारी पहाटे सुमारे 5 ते 5.30 च्या सुमारास सर्व सामसूम असताना ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी 6.30 च्या सुमारास याच दुकानाच्या बाजूने मेघी येथील रमेश गोरुले हे जात असताना मेडिकल स्टोअरमधून धुराचे लोळ बाहेर येताना दिसले. त्यांनी बाजूचे दुकानदार किशोर पाथरे यांना उठवले व मेडिकलमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले. मेडिकलचे मालक जयेंद्र राजाराम चाळके यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यास सांगितले. या घटनेची माहिती अमर चाळके, किरण चाळके यांना कळविण्यात आली. त्यांनी तातडीने चाफवली येथून देवळे येथील मेडिकल
स्टोअर गाठले जयेंद्र चाळके हे देवरुख येथे राहत असल्यामुळे दुकानाची चावी नसल्याने संदीप कानसरे यांनी कुलूप तोडून दुकानाचे शटर उघडले. मात्र, तोपर्यंत आगीने जोर धरला होता. पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत आगीमध्ये स्टोअरमधील संपूर्ण फर्निचरसह औषधे जळून खाक झाली. या आगीची माहिती देवळेचे पोलिस पाटील विजीत साळवी यांनी साखरपा पोलिस ठाण्याला दिली. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयालाही याबाबत खबर देण्यात आली. या घटनेचा पंचनामा संबंधित यंत्रणा करत असून लाखोंचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. ऐन दिवाळीत लागलेल्या आगीमुळे या दुकानाचे मालक जयेंद्र चाळके याना मोठा धक्का बसला आहे.