Ratnagiri : चिपळुणातील रस्ते ‘खड्ड्यांच्या जाळ्यात’

खड्डे खड्ड्यात गेले; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया, निवडणुकीत उमटणार पडसाद
Ratnagiri News
चिपळुणातील रस्ते ‘खड्ड्यांच्या जाळ्यात’
Published on
Updated on

चिपळूण : शहरातील बहुतांश रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या जाळ्यात वाहने अलगद अडकून फसू लागली आहेत. चिपळुणातील रस्ते आणि खड्डे यांचे जुळ्या भावंडांसारखे नाते निर्माण झाले आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रस्त्यावरील याच खड्ड्यांनी न.प.मध्ये वर्चस्व असलेल्यांची सत्ता खड्ड्यात घातली होती. आता पुन्हा रस्ते आणि त्यातील खड्डे या समीकरणावर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत संतप्त चर्चेचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून नागरिक पूर्वी रस्ते खड्ड्यात गेले असे म्हणत होते; मात्र चर्चेच्या धुरळ्यात आता नागरिकांकडून खड्डे गेले खड्ड्यात अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

रस्तोरस्ती खड्डेच खड्डे हे चित्र राज्यभर गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. त्याला चिपळूण शहर देखील अपवाद नाही. रस्ता जन्माला आला की पाठोपाठ खड्ड्यांचा जन्म होतो आणि मग सुरू होते वाहनचालक, नागरिक रस्ता शोधून खड्डे चुकवण्याची स्पर्धा. नागरिकांची नेहमीप्रमाणे ओरड सुरू झाल्यावर या आवाजाने जागे झालेल्या प्रशासनाकडून खड्ड्यांवर दगड-मातीचा लेप चढवला जातो; मात्र काही काळानंतर त्याचीही धुळधाण होऊन वाहने आणि खड्डे यांचे युद्ध सुरु होते. वाहने खड्ड्यातून गेल्यावर सर्वत्र धुरळा पसरून आणि त्या धुरळ्यात वाहन चालवण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. शहरातील

रस्त्यावरील ज्या खड्ड्यांनी मागील नऊ वर्षांपूर्वी न.प.ची एकहाती सत्ता खड्ड्यात घातली, तेच खड्डे आता पुन्हा निवडणुकीच्या तोेंंडावर सर्वपक्षीय राजकारण्यांना सत्ता मिळवण्याचा मार्ग ठरणार आहे. रस्ते आणि खड्डे यांचे समीकरण आणि नाते गेली अनेक वर्षे घट्ट जुळले आहे. मात्र आता रस्त्यांवरील खड्ड्यांची दयनीय स्थिती पाहता ठेकेदाराच्या नावाने खड्डेच शंख करु लागले आहेत. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांना प्रचार चर्चेसाठी रस्ते आणि त्यावरील खड्ड्यांचा विषय सहजसोप्या पद्धतीने वापरता येत असल्याने राजकारण्यांविषयीसुद्धा खड्ड्यांकडून तीव्र संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांबाबत भावना व्यक्त करताना राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी आमची बदनामी करतात? अशी प्रतिक्रिया खड्ड्यातून व्यक्त होत आहे.

गेली काही वर्षे वाहनांचे धक्के आणि दणके सहन करणारे खड्डे भविष्यात स्वतःला सुरक्षित करण्यासाठी रस्त्यावरील वाहतुकीविरोधात बंड करण्याच्या पावित्र्यात आहेत. रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यासाठी संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे निर्माण करून धरणे आंदोलन करण्याची नवी कल्पना अंमलात आणण्याचा विचार सुरू केला आहे. राजकारण्यांकडून खड्ड्याच्या मुद्याद्वारे सत्ता मिळवली जाते. हेच राजकारणी खर्चाचे अंदाजपत्रक करणारे, कामावरील अभियंते, ठेकेदार यांच्याकडून योग्य नियोजनाप्रमाणे काम न करून घेता संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. शहरातील अनेक वर्षांच्या कालावधीत लाखो रूपये खर्च करून तयार झालेले रस्ते आणि पाठोपाठ त्यावर पडलेले खड्डे अशा स्थितीचा गैरफायदा निवडणुकीत राजकारण्यांकडून घेण्याची नवी राजकीय चाल खड्ड्यांनी ओळखली असून रस्त्यांना लाखो रूपयांचा तकलादू डांबराचा मुलामा, मात्र खड्ड्यांना मातीचा लेप देणार्‍या राजकारण्यांना या वेळेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांचे राजकारण खड्ड्यात घालणार काय? अशा भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news