रत्नागिरी जिल्हा : महायुती, महाविकास आघाडी कोणती जागा कोणाला सुटेल, यावरून सहा पक्षात चांगलीच रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय अस्तित्वासाठी जणू या राजकीय पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. (Assembly Election 2024)
रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघासाठी एकनाथ शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्याविरोधात ताकदीचा उमेदवार उभा करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून चाचपणी सुरू आहे. उदय सामंत यांचे या ठिकाणी चार दशके वर्चस्व आहे.
लांजा- राजापूरमधून मोठा पेच उभा राहणार आहे. या ठिकाणी शिंदे गटाकडून किरण ऊर्फ भैय्या सामंत यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र, या ठिकाणी भाजपही आग्रही असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान राजन साळवी यांची उमेदवारी निश्चित असेल. चिपळूण मतदार संघात शरद पवार गटाचे वर्चस्व आहे. मात्र, शेखर निकम हे आता अजित पवार गटात गेल्याने या जागेसाठी महायुतीकडून अजित पवार गट आग्रही असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार गटाकडून प्रशांत यादव यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता असून, या मतदार संघात हा नवीन चेहरा असणार आहे. तर शिंदे गटाकडून सदानंद चव्हाणही इच्छुक आहेत.
खेड दापोली रत्नागिरी जिल्हा येथे उद्धव ठाकरे गटाकडून संजय कदम, एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यात कॉंटे की टक्कर लढत होण्याची शक्यता आहे. योगेश कदम यांचे या ठिकाणी वर्चस्व आहे. गुहागरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून विनय नातू यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. या मतदार संघात एकतर्फी वर्चस्व भास्कर जाधव यांचे आहे.