लांजा-तळवडे-दाभोळे मार्गावर चिऱ्याच्या ट्रकचा भीषण अपघात, चालक व क्लिनर ठार

लांजा-तळवडे-दाभोळे मार्गावर चार महिन्यात चार बळी, अवजड वाहतुकीला विरोध
Chira truck accident on Lanja-Talwade-Dabhole road, driver and cleaner killed
लांजा-तळवडे-दाभोळे मार्गावर चिऱ्याचा ट्रकचा भीषण अपघात, चालक व क्लिनर ठारPudhari Photo
Published on
Updated on

लांजा : पुढारी वृत्तसेवा

लांजा ते सांगलीच्या दिशेने क्षमतेपेक्षा जास्त चिरा घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक ब्रिजला धडकुन भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये ट्रक चालकासह क्लिनर असा दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला. ही घटना (सोमवार) रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान लांजा-तळवडे-दाभोळे मार्गावरील तळवडे रेल्वे ब्रिज येथे घडली.

कमलाकर भागप्पा केंगार (वय २८, रा. पांडोजरी, ता.जत, जि. सांगली) कमलाकर शिवराम गेजगे (वय १७, रा. बोबलड, ता. जत, जि. सांगली) चालक व क्लिनर असे दोघेही जागीच ठार झाले. या घटनेबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर केंगार हा आपल्या ताब्यातील जांभा चिऱ्याने भरलेला ट्रक क्रमांक (के ए २८, डी ५३१२) घेऊन सांगलीच्या दिशेने निघाला होता. लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथील चिरा खाणीमधून चीरा घेऊन सांगली येथे निघाला होता. चिऱ्याने भरलेला ट्रक रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान तळवडे येथील रेल्वे ब्रिज जवळ आला असता भरधाव असणारा व रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक चालक केंगार याचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव असलेला ट्रक समोरील रेल्वे ब्रिजच्या संरक्षक कठड्याला धडकला. या आघातात चालक केंगार व क्लिनर गेजगे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची भीषणता एव्हढी होती की, ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला. या ट्रकमध्ये १५०० हून अधिक चिरा असल्याचे येथील नागरिकांनी प्रथमदर्शनी सांगितले. या अपघाताची माहिती तळवडे पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांनी लांजा पोलिसांना दिली. तळवडे बीटचे पोलिस अंमलदार भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या अपघाताची नोंद लांजा पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

(लांजा-तळवडे-दाभोळे या मार्गावर बळींची संख्या चार महिन्यात चार झाली आहे. या मार्गावरील क्षमतेपेक्षा अधिक होणारी अवजड वाहतूकी विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आली होती. तरीही या मार्गावर अवजड वाहतूक सुरू आहे. नागरिकांचा विरोध असूनही सुरू असणारी वाहतूक सुरू असल्याने येथील जनतेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लांजा तालुक्यातील विविध पक्षांनी लांजा-आसगे-तळवडे-दाभोळे मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी सातत्याने केली आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक होत असल्याने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही दिली होती. आजही या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे. या रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली आहे. वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात याच मार्गावर चिरा वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने दोघांना चिरडले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news