चिपळूण : गेले दोन-तीन दिवस चिपळुणात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काका-पुतण्यांच्या राजकीय दौर्याने चिपळुणातील राजकीय स्पर्धा टीपेला पोहोचली आहे. या राष्ट्रवादी अंतर्गत स्पर्धेतच नवा विषय चर्चिला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या दौर्यामध्ये आ. भास्कर जाधव आणि त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी घेतलेल्या भेटीबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहेत.
शनिवारी (दि.21) चिपळूणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची जनसन्मान यात्रा आली होती. आ. शेखर निकम यांच्या पुढाकाराने ही यात्रा झाली. यावेळी जि. प.चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी अजित पवार यांची भेट घेतली व त्यांचे आगतस्वागत केले. यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच सोमवारी (दि.23) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार चिपळूण दौर्यावर आले. प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या निमित्ताने आलेल्या खा. शरद पवार यांची भेट शिवसेना नेते व गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी घेतली. यामुळे राजकीय गोटात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. आमदारांनी काकांची आणि मुलाने पुतण्याची भेट घेतल्याने राजकीय खलबते रंगली आहेत. या पार्श्वभूमीवर आ. भास्कर जाधव यांनीदेखील खुलासा केला आहे. ज्या-ज्या वेळी आपल्या तालुक्यात एखादा मोठा राजकीय पदाधिकारी येतो त्या-त्या वेळी आपण त्याचे स्वागत करायला जातो. अनेक वर्षे हे सुरू आहे. त्या प्रमाणेच आपण इथे नसताना माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव हे आपल्या सूचनेनुसारच उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्वागताला गेले तर आज आपण स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो. ज्याप्रमाणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दैवत आहेत, त्या प्रमाणेच खा. शरद पवार हे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण आपला दौरा सोडून चिपळुणात येऊन स्वागत केले, असे त्यांनी स्पष्ट केले.