
खेड; पुढारी वृत्तसेवा : गद्दार लोकांना धडा शिकवण्यासाठी तयार रहा, असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. रेल्वे स्थानकात सोमवरी (दि.५) सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याचे आगमन झाले. येथे हजारो कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. खेड शहर, तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत खा. विनायक राऊत, आ.भास्कर जाधव, आ.राजन साळवी, माजी आमदार संजय कदम, जिल्हा प्रमुख सचिन कदम, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक , खेड शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या सोबत असल्याचे सांगत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत खेड रेल्वे स्थानक परिसरात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधला. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी कोकणातील प्रत्येक मतदार संघात प्रचार सभा घेणार आहे. गद्दार लोकांना धडा शिकवण्यासाठी तयार रहा. मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे. संघटन बांधण्यासाठी मशाल घेऊन कामाला लागा. अर्ध्या तासाच्या झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने खेडवासिय भारावून गेले. ठाकरे वंदे भारत ट्रेन मधून मुंबई च्या दिशेने मार्गस्थ झाले.