रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची बॅग लांबवून ५ लाखांचा मुद्देमाल पळवला | पुढारी

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची बॅग लांबवून ५ लाखांचा मुद्देमाल पळवला

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेच्या हातातली बॅग लांबवून सुमारे ५ लाख २७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ७ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याचा सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रमिला प्रभाकर तळेकर (६०, रा.फोंडाघाट गडगे-सखलवाडी, कणकवली) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रमिला या वसई ते कणकवली असा रेल्वेतून प्रवास करत होत्या. ७ डिसेंबरला पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबण्यासाठी स्लो झाली असता अज्ञात प्रमीला यांच्या सीटच्या शेजारी येवून उभा राहिला व त्याच संधीचा फायदा घेत प्रमिला यांच्या हातातील लाल रंगाची बॅग जबरदस्तीने खेचून रेल्वेतून उडी मारून पळून गेला.

बॅगमध्ये 1 लाख 70 हजार रुपयांचे ४ तोळयांचे ३ पदरी मंगळसूत्र व सोन्याची साखळी, तीन अंगठ्या, सोन्याची चेन, हार, कुड्या, झुमके, नथ आणि रोख 9 हजार रुपये असा एकूण 5 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. प्रमिला यांनी याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर २१ डिसेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Back to top button