सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : सावंतवाडीपासून जवळच माजगावच्या हद्दीला लागूनच असलेल्या इन्सुली मेटातील सातजांभळ परिसरात जवळपास 100 मीटर आत जंगलात गळफास लावलेल्या स्थितीत पुरुषाचा सांगाडा आढळून आला. हा सांगाडा अनोळखी इसमाचा असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. गळफास स्थितीतील तो सांगाडा जवळपास 1 वर्षांपूर्वीचा असल्याची शक्यता आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली. हा घातपात आहे की आत्महत्या? याचा तपास करण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जंगलात गेलेल्या काही व्यक्तींना गुरुवारी दुपारच्या सुमारास हा सांगाडा दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद,पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते, पोलिस एस. एन. लोहकरे, महेश जाधव, हवालदार श्री. सावंत, श्री. जाधव यांनी घटनास्थळी पंचनामा केला. हा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. मृतदेहाच्या कवटीला फासकी व उर्वरित दोरी झाडावर होती. तर सांगाड्याचेही तुकडे-तुकडे झाले आहेत. गळ्यातील दोरी व झाडावर तुटलेली दोरी यामुळे प्रथमदर्शनी त्याने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. तर त्याच्या अंगावर कपडे असून कपड्यावरून तो पुरुष जातीचा सांगाडा असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, त्याची ओळख पटलेली नाही. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह पूर्णतः सडून फक्त सांगाडा शिल्लक राहिल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. आता त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान घटनास्थळाच्या परिस्थितीवरून हा मृतदेह जवळपास वर्षभरा पूर्वीचा असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरापूर्वीपासून बेपत्ता असलेल्या इसमाची यादी काढून त्यांचा शोध घेण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.