चिपळुणात पूरमुक्तीसाठी उपोषण | पुढारी

चिपळुणात पूरमुक्तीसाठी उपोषण

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी चिपळूण बचाव समितीच्या वतीने शहरातील प्रांत कार्यालयासमोर महापरिनिर्वाणदिनी साखळी उपोषणाला प्रारंभ झाला. शहरासह परिसरातील नागरिकांनी व सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी या उपोषणात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि शहर पूरमुक्तीसाठी शासनाचे लक्ष वेधावे म्हणून उपोषण सुरू केले.

22 जुलै रोजी चिपळुणात महापूर आला. या महापुरात अडीच हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, अद्यापही सर्व नुकसानग्रस्तांना मदत झालेली नाही. बाजारपेठेची मोठी हानी झाली. या पार्श्वभूमीवर शासनाने वाशिष्ठी, शिव नदीतील गाळ काढावा आणि अन्यायकारक पूररेषा रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शहर परिसरातील नागरिक एकवटले असून चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून लढा सुरू केला आहे. आज महापरिनिर्वाणदिनी चिपळूण न.प. समोरील छत्रपती शिवाजी महाराज व बहादूरशेख चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरू झाले. शहरातील नागरिक रॅलीने प्रांत कार्यालासमोरील आवारात उपोषणासाठी एकवटले. मोटारसायकल, चालत अशा माध्यमातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी ‘चिपळूण बचाव’च्या घोषणा देण्यात आल्या. अनेक व्यावसायिकांनी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दुकाने बंद ठेवली होती. त्यात भाजी व्यावसायिक, पान टपरी आदींचा मोठा सहभाग होता.

या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून आंदोलनस्थळी आ. शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, काँग्रेसचे अशोक जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, शिवसेनेचे बाळा कदम, चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, शिरीष काटकर, राजेश वाजे, शाहनवाज शाह, सतीश कदम, किशोर रेडीज, उदय ओतारी, अरुण भोजने, समीर जानवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रमाणेच सर्वपक्षीय नगरसेवक, पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, परिसरातील सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले.

सोमवारी सकाळी 10 वा. न.प. येथून चिपळूण बचाव रॅलीस प्रारंभ झाला. यानंतर ही रॅली चिंचनाका, मध्यवर्ती बसस्थानकामार्गे प्रांत कार्यालयापर्यंत पोहोचली. यानंतर उपोषणास प्रारंभ झाला. उपोषणस्थळी चिपळूण बचाव समितीचे प्रकाश काणे यांनी मार्गदर्शन करताना, भविष्यात चिपळूण वाचायचे असेल तर हीच वेळ आहे. सर्वांनी या उपोषणात सहभागी व्हा आणि शासनाकडे दाद मागा. वाशिष्ठीचे पाणी अनेक वर्षे चिपळुणातून वाहत आहे. साठ वर्षे होऊन गेली तरी या नद्यांमधील गाळ काढलेला नाही. वाळू आणि पाण्यातून मोठा महसूल शासनाला मिळतो. मात्र, गाळ न काढल्याने नद्या होरल्या आहेत. याचा परिणाम चिपळूणवर होत आहे. नद्या गाळमुक्त झाल्या तर शहरात पूर येणार नाही आणि पूररेषेचा प्रश्नही राहाणार नाही. त्यामुळे हे आंदोलन शासन निर्णय घेईपर्यंत सुरूच राहील, असे सांगितले.

शिरीष काटकर व अरुण भोजने यांनी हा पूर केवळ अतिवृष्टीमुळे आला नाही तर कोयनेतून मोठ्या प्रमाणात अवजल एकाचवेळी सोडण्यात आले. यामुळे अचानक पाणी शहरात सोडल्याने मोठे नुकसान झाले. हे पाणी सोडताना कोणताही इशारा देण्यात आला नाही हा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे यापुढील काळात शासनाने काळजी घ्यावी. वरील काही जिल्हे वाचविण्यासाठी चिपळूण बुडविले गेले असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. काँग्रेसचे अशोक जाधव म्हणाले, 2005 च्या महापुरानंतर आपण शासनाकडे सातत्याने गाळ काढण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला त्यावेळी यशही आले होते. वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढला गेला होता. आता मोठ्या प्रमाणात मातीची धूप होत आहे. वृक्षतोडीमुळे गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे लोकांनी बांबू लागवड करावी. नदीच्या किनारी व उजाड डोंगरावर बांबूची लागवड झाल्यास मातीची धूप होणार नाही असे सांगून चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी आपणही लढा देऊ, अशी घोषणा केली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून चिपळूणच्या महापुराचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. उपोषणस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

आजीबाईंचाही उपोषणाला पाठिंबा

चिपळूण शहरातील जुना बसस्थानकाजवळ कोथिंबीर विकणार्‍या एका वृद्ध आजीने या उपोषणात सहभाग घेऊन पाठिंबा दिला. गेली अनेक वर्षे मी चिपळुणात येऊन कोथिंबीर जुडी विकत आहे. आता भाजी मंडईदेखील नाही. त्यामुळे रस्त्यावर बसून जुडी विकण्याचे काम करते. चिपळूणच्या महापुरात माझ्या घरालाही धक्का बसला. मात्र, या आजीबाईंची साधी कुणी विचारपूसही केली नाही. शासनाने मदतही दिली नाही. आजही पोटासाठी हा व्यवसाय करीत आहे. मात्र, चिपळूणची पुरापासून मुक्ती झाली पाहिजे, यासाठी आज आपण येथे आलो आहोत. त्यामुळे या आंदोलनास आपला पाठिंबा आहे. शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही आजीबाईंनी व्यासपीठावरून केली.

Back to top button