अवकाळी पावसाने कोकणचे कंबरडे मोडले | पुढारी

अवकाळी पावसाने कोकणचे कंबरडे मोडले

अलिबाग/ सिंधुदुर्ग / रत्नागिरी : जयंत धुळप, सूरज कोयंडे, अनिल देशमुख : निसर्गाचे चक्र उलटे फिरू लागले असून, दर दोन-चार महिन्यांनी येणारे नवनवे संकट बळीराजाला पार उद्ध्वस्त करत आहे. या आठवड्यात धुवाधार कोसळलेल्या अवकाळी पावसाने कोकणातील शेतकर्‍यांचेही कंबरडे मोडले असून सुमारे 2.5 हजार कोटींचा फटका येथे बसला आहे. रत्नागिरीत आंबा आणि काजूबागांची हानी झाली असून नुकसानीचा हा आकडा सुमारे 1300 कोटींचा तर सिंधुदुर्गात देवगड हापूसला 600 कोटींचा फटका बसला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हापूस, काजू आणि मच्छीमारीला 1300 कोटींचा फटका बसल्याचे आंबा उत्पादक संघाचे डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात आंबा आणि पांढर्‍या कांद्याचे 350 कोटींचे नुकसान झाले असून, 100 कोटींची उलाढाल असलेल्या पालघरमधील चिकू बागायतींना 50 कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती पालघरच्या चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी दिली.

यावर्षी 17 ते 21 नोव्हेंबर रोजी आणि 1 व 2 डिसेंबर रोजीच्या कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेती आणि विशेषतः आंबा बागायतीचे नुकसान हे सध्या दिसते, त्यापेक्षा येत्या दोन-तीन महिन्यांच्या काळात पुढे दिसून येणारे नुकसान हे खूप मोठे असेल. संपूर्ण मोहर गळून गेला आहे. शिल्लक असलेला मोहर कीडबाधित होत आहे. परिणामी, पहिल्या दमदार मोहराचा आंबा यंदा मिळू शकणार नाही, अशी भीती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी व्यक्‍त केली.

देवगड हापूस विसरा

देवगड हापूस हा सर्वात आधी मुबलक प्रमाणात व्यापारासाठी बाजारात येतो. यापाठोपाठ रत्नागिरी हापूस बाजारात स्पर्धेसाठी उतरल्यावर देवगड हापूसचा दर उतरतो. देवगड हापूस सर्वात आधी बाजारात येतो. हेच देवगडमधील अर्थकारणाचे गमक आहे. जर हापूस सर्वात आधी बाजारात यायला हवा तर देवगड हापूसला सर्वात आधी मोहर यायला हवा. मात्र अवकाळी पावसाने तीच प्रक्रिया खंडित केली आहे.

जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने मोहराऐवजी थेट पालवी फुटणार आहे. ही पालवी जून होण्याची प्रक्रिया झाल्यावर पुन्हा मोहर येईल. यामुळे देवगड हापूस यंदा तरी बाजारात लवकर दाखल होणार नाही. काही ठिकाणी मोहर आला होता, मात्र मोहरांच्या फुलामध्ये पाणी साठून राहते व मोहर काळा पडतो.यामुळे आलेल्या मोहराचाही फारसा फायदा होणार नाही.

रायगड जिल्ह्यातील 14 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर आंबा बागायत असून 52 हजार आंबा बागायतदार शेतकरी आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभास आंब्याला दमदार मोहर आल्याने त्यांवर कीटकनाशकांची फवारणी करून त्यांच्या सुयोग्य वाढीची तयारी बागायतदारांनी केले होती. गेल्या दोन वर्षांतील चक्रीवादळांमध्ये मुळात आंब्याची कलमे कमी झाली आहेत. नवीन लागवड केलेल्या कलमे आगामी तीन-चार वर्षांनी फळे देण्यास प्रारंभ करतील.

परिणामी जी कलमे बागायतीमध्ये अस्तित्वात आहेत त्याची मोहरपूर्व मशागत अत्यंत काळजीपूर्वक करण्यात बागायतदार कार्यमग्न होते आणि त्यातच अवकाळी पाऊस झाल्याने मोहरपूर्व मशागतीवर केलेला खर्च आणि मोहर आल्यावर कीटकनाशकांच्या फवारण्यांकरिता केलेला 100 टक्के खर्च वाया गेला आहे. त्यातच आता मोहर गेल्याने, आंब्याची झाडे पुन्हा मोहरून, परागीभवन होऊन, आंबा फळधारणा यंदा होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी अधिकचा लागणार आहे. मात्र त्यामध्ये संपूर्ण अनिश्‍चितताच असल्याचे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.

आंबा बागायतीमधील गेल्या किमान 40 वर्षांचे अनुभवी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील प्रयोगशील आंबा बागायतदार डॉ.विवेक भिडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग तिसर्‍या वर्षी अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार अडचणीत आला असून तो आर्थिक संकटात सापडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 65 हजार हेक्टर आंबा बागायतीचे क्षेत्र असून सुमारे 70 हजार आंबा उत्पादक बागायतदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 33 हजार हेक्टर आंबा बागायतीचे क्षेत्र असून 40 हजार आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत आंबा बागायतीचे या अवकाळी पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार हेक्टरी सरासरी 2 लाख ते 4 लाख रुपये नुकसान झाले आहे.

किनारी भागातील आंबा बागांचे नुकसान अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येत असल्याचे डॉ.विवेक भिडे यांनी पुढे सांगितले. दरम्यान पालघर जिल्ह्यातील प्रत्येक दिवसाला डहाणू व जिल्ह्यातील इतर तालुक्यांतून जवळपास चारशे ते पाचशे टन चिकू हा देशातील विविध राज्यांमध्ये निर्यात केला जातो. जवळपास प्रत्येक महिन्याला 75 ते 100 कोटींची उलाढाल असलेली चिकूची मोठी बाजारपेठ डहाणू तालुक्यात उपलब्ध आहे.

सांगलीला 3.5 हजार कोटींचा फटका

अवकाळीने एकट्या सांगली जिल्ह्याचे 3.5 हजार कोटींचे नुकसान झाले असून, सांगलीतील द्राक्षबागा निम्म्यापेक्षा जास्त गारद झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी, डाळिंब आणि द्राक्षबागांना बसलेला तडाखा अंदाजे 1500 हजार कोटी रुपयांचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भात आणि ज्वारी पिकाचे नुकसानही 120 कोटींच्या घरात आहे.

दै. ‘पुढारी’ टीमने प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकर्‍यांची आजची स्थिती जाणून घेतली असता हे विदारक चित्र समोर आले. आधीचीच नुकसानीची भरपाई मिळाली नाही आणि आता हाता-तोंडात आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला. मेटाकुटीस आलेला बळीराजा आर्त स्वरात विचारतो आहे, ‘मायबाप सरकार, सांगा आम्ही आता जगायचं कसं?’

Back to top button